Cytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू! 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:25 AM2021-05-18T07:25:22+5:302021-05-18T07:26:36+5:30
आपल्या अवतीभोवती पाण्यात, मातीत किंवा आपल्या नाकात, आतड्यांत अनेक जीवजंतू असतात
डॉ. मंगला बोरकर प्राध्यापक, जेरियाट्रिक्स, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी), औरंगाबाद
परवा एका मान्यवरांचे कोरोनाचा संसर्ग झाल्यावर तीन आठवड्यांनंतर सायटोमेगॅलो व्हायरसने दु:खद निधन झाल्याची बातमी समजली. कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी स्टेरॉइड्स द्यावे लागतात, तसेच टोसिलिझुमॅबसारखे (जीवरक्षक नाही असा निष्कर्ष आहे तरी) औषध वापरण्यात येते. ही औषधे मार्गदर्शक तत्त्वे पाळून आवश्यकता असेल तरच आणि कमीत कमी प्रमाणात द्यायला हवीत. या औषधांमुळे रुग्णांची इम्युनिटी खूप कमी होते.
आपल्या अवतीभोवती पाण्यात, मातीत किंवा आपल्या नाकात, आतड्यांत अनेक जीवजंतू असतात. जर एखाद्याची प्रतिकारशक्ती कमी झाली तर निद्रस्थ अवस्थेत राहणारे जीवजंतू या परिस्थितीचा फायदा घेऊन शरीरावर आक्रमण करतात. कोविडमधून वाचलेल्या गंभीर रुग्णांमध्ये दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यांनंतर होणारी “काळी बुरशी” सध्या धुमाकूळ घालत आहे. सायटोमेगॅलो व्हायरस हा विषाणूसुद्धा असाच संधिसाधू आहे.
डॉ. किशोर पारगावकर, हृदयरोगतज्ज्ञ
सायटोमेगॅलो व्हायरस (सीएमव्ही) हा एक सामान्यपणे आढळणारा विषाणू आहे.
रोग्याच्या शारीरिक द्रावातून- जसे की लाळ, लघवी, दूध इ. यांचा फैलाव होऊ शकतो.
सामान्य व्यक्तीला सहसा याचा कुठलाही त्रास होत नाही. फक्त काहींना ताप व अशक्तपणा जाणवू शकतो.
ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यांना मात्र डोळे, फुप्फुस, यकृत, किडनी, मेंदू, आतडे अशा अनेक अवयवांना गंभीर इजा होेऊ शकते.
आयजीएम अँटीबॉडी तपासणीद्वारे हा नुकताच झालेला आजार आहे का, हे कळते.
यामध्ये गॅनसायक्लोव्हीर/ व्हॅलगॅनसायक्लोव्हीर या औषधांचा फायदा होतो.
डॉ. अनिल गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद.
सायटोमेगॅलो व्हायरस हा विषाणू हरपीस जातीच्या विषाणूंपैकी एक आहे.
एलायझा व पीसीआर चाचणीद्वारे या विषाणूचे निदान होऊ शकते.
मनुष्यापासून मनुष्याला शरीरातील स्रावातून पसरतो.
बऱ्याच सामान्य लोकांमध्ये या विषाणूंचा संसर्ग झालेला असतो आणि कुठलीही लक्षणे नसतात.
हा विषाणू लाळेच्या ग्रंथीत किंवा किडनीमध्ये शांतपणे राहतो; पण जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा हा शरीराच्या वेगवेगळ्या अवयांना हानिकारक ठरू शकतो.
ज्या पेशींमध्ये हा विषाणू वाढतो त्या पेशींचा आकार खूप मोठा होतो.