अॅस्प्रिनने नाही टाळता येत हार्ट अटॅकचा धोका, 'हे' नुकसानही होतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 10:38 AM2018-09-20T10:38:04+5:302018-09-20T10:38:19+5:30
एका रिसर्चमधून समोर आले आहे की, रोज अॅस्प्रिन घेतल्यास हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका कमी होत नाही.
अॅस्प्रिन (Aspirin) एक सॅलिसिलेट औषधी आहे जे वेदना आणि ताप कमी करण्यासाठी दिलं जातं. आधी करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, हार्ट अटॅकनंतर लगेच थोड्या प्रमाणात अॅस्प्रिन घेतल्यास मृत्यू धोका कमी केला जाऊ शकतो. पण आता एका ताज्या रिसर्चनुसार जी बाब समोर आली ती याउलट आहे. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, रोज अॅस्प्रिन घेतल्यास हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका कमी होत नाही.
अॅस्प्रिनचा वापर अनेक वर्षांपासून वेदना दूर करण्यासाठी केला जात आहे. तसेच ज्या लोकांना आधी हृदय विकाराचा झटका आला आहे त्यांनी हे औषध घेतले तर त्यांना पुन्हा हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो, अशी १९६० मध्ये या औषधाची ओळख होती.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित तीन अभ्यासानुसार, ७० वर्षांच्या निरोगी वयोवृद्धांना दररोज अॅस्प्रिनचा कमी प्रमाणाच डोज(100 मिली ग्रॅम) देऊनही त्यांना हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका कमी झाला नाही. आणि सोबतच वाढत्या वयासोबत येणाऱ्या इतर आजारांचाही धोका कमी झाला नाही.
'एएसपीआरईई' नावाच्या या अभ्यासात ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या १९ हजार लोकांवर ७ पेक्षा जास्त अध्ययन केले गेले. ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विश्वविद्यालयाचे प्राध्यापक जॉन मॅकनील यांनी सांगितले की, 'या अनेक वर्षांच्या आणि कठीण अध्ययनातून हे समोर आलं की, वयोवुद्धांना निरोगी ठेवण्यास अॅस्प्रिनची काहीही मदत होत नाही'.
अॅस्प्रिनचे साइड इफेक्ट
१) अस्थमा किंवा इतर श्वासासंबंधी आजाराने पीडित लोकांनी अॅस्प्रिन घेऊ नये. कारण याने त्यांच्या फुफ्फुसामध्ये आकुंचन निर्माण होऊ शकतं.
२) काही लोकांनी काही गोष्टींची अॅलर्जी असते. काहींना अॅस्प्रिनचीही अॅलर्जी असू शकते.
३) याचे सतत सेवन केल्याने इंटरनल ब्लीडिंगचा धोका असतो. कारण याने रक्त फार जास्त पातळ होतं.
४) १६ वर्षांच्या मुलांना हे दिल्यास त्यांच्या लिव्हरवर आणि मेंदुवर सूज येऊ शकते.