धोका : एडेनो विषाणूने घेतला आणखी दोन बालकांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 09:08 AM2023-03-01T09:08:10+5:302023-03-01T09:08:22+5:30
नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश...
कोलकाता : कोलकाता येथील दोन सरकारी रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या संसर्गामुळे आणखी दोन अर्भकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. या मृत्यूंना एडेनो विषाणू कारणीभूत आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हुगळी जिल्ह्यातील चंदरनगर येथील रहिवासी असलेल्या नऊ महिन्यांच्या बाळाला कोलकाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलाचा अन्य रुग्णालयात मृत्यू झाला. पश्चिम बंगालमध्ये गेल्या शनिवार आणि रविवारी तीन मुलांचा श्वसनसंसर्गामुळे मृत्यू झाला. यातील एका बालकाचा एडिनो विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. यापूर्वी पश्चिम बंगालमधील मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढल्याचे दिसून आले आहे.
संसर्गाची लक्षणे
एडेनो विषाणूमुळे सर्दी किंवा फ्लू सारखा आजार होऊ शकतो. हा विषाणू कोणत्याही विशिष्ट ऋतूमध्ये पसरत नाही, तर वर्षभरात कधीही संक्रमित होऊ शकतो. हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस ते अधिक सक्रिय होतात. हा विषाणू पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सर्वांत धोकादायक आहे.