ॲल्युमिनियमच्या भांड्यांत जेवण करणे धोकादायक, मिळतंय अल्झायमरला निमंत्रण  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 10:44 AM2022-07-14T10:44:45+5:302022-07-14T10:45:13+5:30

इजिप्तनंतर भारतीय युनिव्हर्सिटीचा दावा

Dangerous eating in aluminum plates is an invitation to Alzheimer health news | ॲल्युमिनियमच्या भांड्यांत जेवण करणे धोकादायक, मिळतंय अल्झायमरला निमंत्रण  

ॲल्युमिनियमच्या भांड्यांत जेवण करणे धोकादायक, मिळतंय अल्झायमरला निमंत्रण  

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय घरांमध्ये ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे ही एक सामान्य बाब आहे. पण, ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने अल्झायमर रोगाचा धोका वाढू शकतो, असा दावा एमएस युनिव्हर्सिटी वडोदराच्या संशोधक टीमने केला आहे. विशेषत: ॲल्युमिनियमच्या कढईत खाद्यपदार्थ तळून घेतल्यास किंवा डीप फ्राय केल्यास आपल्या अन्नासह मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियमचे सूक्ष्म कण येतात. अल्झायमर सोबतच यामुळे ऑस्टिओपोरोसिस, किडनी फेल्युअर आणि इतर अनेक समस्यादेखील उद्भवू शकतात. 

संशोधकांना ॲल्युमिनियम भांडे आणि अल्झायमर रोग यांच्यातील संबंध आढळून आला, जो एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामुळे मेंदू संकुचित होतो आणि मेंदूच्या पेशी मरतात.  तळून पदार्थ तयार केल्यावर ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त तापमानात वितळू लागते. यामुळे अन्नात धातू मिसळते, ज्यामुळे आपली पचनसंस्था खराब होते. 

अन्न पॅकिंगसाठी ॲल्युमिनियम फॉयल वापरणाऱ्यांच्या तुलनेत जे वारंवार तळण्यासाठी आणि उकळण्यासाठी ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर करतात. त्यांच्यामध्ये अल्झायमरची तीव्रता जास्त आहे, असेही संशोधकांना आढळून आले. 

पर्याय काय?
संशोधकांनी ॲल्युमिनियम भांड्याऐवजी स्टेनलेस स्टील किंवा ओव्हन-फ्रेंडली काचेच्या भांड्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. लोखंडी कढईदेखील एक चांगला पर्याय आहे. कारण कढईला कोणत्याही कृत्रिम किंवा हानिकारक पदार्थांचा लेप नसतो. यामुळे अन्नातील लोहाचे प्रमाणही वाढते जे ॲल्युमिनियमच्या वापरापेक्षा आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे.

इजिप्तच्या युनिव्हर्सिटीनेही केला होता दावा 
इजिप्तच्या ऐन शम्स युनिव्हर्सिटीतील केमिस्ट्रीच्या प्राध्यापक घडा बसिओनी यांनीही २०१६ मध्ये त्यांच्या संशोधनानंतर, स्वयंपाक करताना ॲल्युमिनियम वापरण्याचे संभाव्य दुष्परिणाम आहेत असे सांगितले होते. रक्तामध्ये सहन करू शकणाऱ्या सुरक्षित पातळीपेक्षा ॲल्युमिनियमचे प्रमाण ओलांडल्यावर मनुष्याला नुकसान सुरू होते.

Web Title: Dangerous eating in aluminum plates is an invitation to Alzheimer health news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.