सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? मग डार्क चॉकलेट खा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 06:02 PM2019-02-11T18:02:05+5:302019-02-11T18:02:22+5:30
थंडीमध्ये सर्दी आणि खोकला होणं ही एक साधारण गोष्ट आहे. या दिवसांमध्ये वातावरणात पसरलेल्या गारव्यामुळे घसा खराब होतो. परिणामी खोकला आणि सर्दी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात.
थंडीमध्ये सर्दी आणि खोकला होणं ही एक साधारण गोष्ट आहे. या दिवसांमध्ये वातावरणात पसरलेल्या गारव्यामुळे घसा खराब होतो. परिणामी खोकला आणि सर्दी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. एवढचं नाही तर अनेक घरगुती उपायही केले जातात. एवढं सगळं करूनही या समस्या काही दूर होण्याचं नाव घेत नाहीत. अशातच आम्ही तुम्हाला काही अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत. जे चवीला स्वादिष्ट असण्यासोबतच खोकल्यापासूनही लगेच आराम देण्यास मदत करतो.
चॉकलेट आहे खोकल्यावरील रामबाण उपाय
अनेक संशोधनांमधून समोर आलेल्या निष्कर्षांमधून केलेल्या दाव्यानुसार, चॉकलेट खाल्याने खोकल्याची समस्या दूर होण्यास मदत होते. यूनिवर्सिटी ऑफ हल कार्डिओवॅस्कुलर आणि रेस्पिरेटरी विभागाचे प्रमुख प्रोफेसर एलिन मोरिस यांनी केलेल्या संशोधनानुसार, खोकला झाल्यावर डार्क चॉकलेटचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. यामुळे औषधांपेक्षाही झटपट आराम मिळण्यास मदत होते.
असं म्हटलं जातं की, चॉकलट्समध्ये असणारं कोकोआ दोनच दिवसांमध्ये खोकला दूर करतं. संशोधनानुसार, कोकोआमध्ये एल्कलॉइड आढळून येतं. जे कोडीनप्रमाणे परिणामकारक ठरतं. कोडीन बाजारामध्ये मिळणाऱ्या खोकल्याच्या औषधांमध्ये आणि सिरपमध्ये आढळून येणारा घटक आहे. जो खोकल्यापासून सुटका करण्यासाठी मदत करतो.
खोकला झाल्यावर पिण्यात येणाऱ्या सिरपमुळे घशामध्ये एक लेयर तयार होते. त्यामुळे इन्फेक्शन कमी करण्यासोबतच आणखी वाढू न देण्यासही मदत होते. डार्क चॉकलेट खाल्याने गळ्यामध्ये या सिरपपेक्षाही मोठी लेयर तयार होण्यास मदत होते. त्यामुळे खोकला लवकर बरा होण्यास मदत होते. तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल आणि औषधं घेऊन कंटाळला असाल तर डार्क चॉकलेट खाण्यास सुरुवात करा.
डार्क चॉकलेटचे फायदे :
- तणाव कमी करण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाल्याने तणाव कमी होतो.
- उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते.
- कोकोमध्ये असलेल्या अँटीऑक्सिंड्टसमुळे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत होते.
- हृदयासाठी चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते.
- चॉकलेट खाण्याने व्यक्तीचा मूड सुधारतो. डार्क चॉकलेटच्या सेवनाने थकवा कमी होण्यास मदत होते.
- कोकोपासून बनवण्यात आलेली उत्पादने कार्डिओ मेटाबॉलिकचे स्वास्थ सुधारण्यास मदत करतात.