मृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:43 PM2019-09-17T16:43:46+5:302019-09-17T16:52:25+5:30
मनुष्याच्या मृतदेहाबाबत रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा करण्यात आला आहे.
(Image Credit : nationalpost.com)
सामान्यपणे असं समजलं जातं की, मृत्यू झाल्यावर व्यक्तीच्या शरीराची हालचाल बंद होते किंवा शरीर प्रतिक्रिया देणं बंद करतं. पण असं नसल्याचं एका वैज्ञानिकेने दावा केला आहे. मृत्यूनंतरही मनुष्याच्या शरीराची हालचाल सुरूच राहते. इतकेच नाही तर मृत्यूनंतर तब्बल एक वर्षापर्यंत ही हालचाल सुरू राहते, असा आश्चर्यजनक दावा ऑस्ट्रेलियातील महिला वैज्ञानिक एलिसन विल्सन यांनी केला आहे.
nationalpost.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, एलिसनने एका मृतदेहाचं साधारण १७ महिने निरिक्षण केलं आणि मृतदेहाची प्रत्येक प्रतिक्रिया कॅमेरात कैद केली. एलिसनचं म्हणणं आहे की, मनुष्याचा मृत्यू भलेही होत असेल, पण त्यानंतरही शरीराची हालचाल होत राहते. हेच कारण आहे की, अनेकदा लोक मृत व्यक्तीलाही जिवंत समजतात.
एलिसन विल्सन सांगतात की, सुरूवातील मृतदेहाचा हात त्याच्या शरीराला चिकटून ठेवला होता. पण काही दिवसांनी आढळलं की, मृतदेहाचा हात आपोआप शरीरापासून दूर सरकला आहे. त्यांचं मत आहे की, असं कदाचित डीकंपोजिशनमुळे झालं होतं. कारण जसजसं शरीर आक्रसतं, तसतशी शरीराची हालचालही होत राहते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलिसन या मृतदेहावर अभ्यास करण्यासाठी दर महिन्याला फ्लाइटने कॅनर्सहून सिडनीला जात होत्या. त्यांचं म्हणणं आहे की, बालपणापासूनच त्यांना हे जाणून घेण्याची जिज्ञासा होती की, मृत्यूनंतर शरीराचं काय होतं आणि त्यात काय-काय बदल होतात.
फॉरेन्सिक सायन्स इंटरनॅशनल सिनर्जी जर्नलनुसार, या रिसर्चच्या मदतीने मृत्यूनंतर शरीरात होणाऱ्या बदलांना जाणून घेता येईल. तर दुसरीकडे एलिसन त्यांच्या या रिसर्चवर फार खूश आहेत की, कारण त्या जगासमोर काहीतरी नवीन घेऊन आल्यात.