बापरे! कोरोनानंतर Diabetes रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ; महिला, तरुणांना सर्वाधिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 04:43 PM2024-01-25T16:43:08+5:302024-01-25T16:51:27+5:30
कोरोना महामारीनंतर डायबेटिस रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
कोरोना महामारीच्या काळात डायबेटीसच्या रुग्णांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता एका नवीन संशोधनात ही चिंता खरी ठरत आहे. 'द लॅन्सेट डायबेटीस अँड एंडोक्रिनोलॉजी' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, कोरोना महामारीनंतर डायबेटीस रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
सर्वाधिक फटका महिला आणि तरुणांना बसत असल्याचंही संशोधनात आढळून आलं आहे. संशोधनानुसार, हे मृत्यू डायबेटीस संबंधित समस्यांमुळे आणि साथीच्या आजारादरम्यान उपचारात अडथळा आल्याने झाले असावेत. डब्ल्यूएचओच्या शास्त्रज्ञांसह संशोधकांच्या टीमने जगभरातील 138 रिसर्चचे पुनरावलोकन केले आहे.
रुग्णांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं?
संशोधकांचा असा विश्वास आहे की, रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी आणि साथीच्या काळात लॉकडाऊनमुळे डायबेटीसच्या रुग्णांना नियमित तपासणी, औषधे आणि काळजी घेणं शक्य झालं नाही. याशिवाय, कोरोना संसर्गाचा धोका डायबेटीसच्या रुग्णांना रुग्णालयात जाण्यापासून रोखू शकतो.
मुलांमध्ये वाढल्या समस्या
संशोधकांना असं आढळून आलं की, कोरोनानंतर मुलं आणि तरुणांमध्ये डायबेटीसचे प्रमाण वाढले आहे. जगभरातील आयसीयूमध्ये येणाऱ्या डायबेटीस असलेल्या लहान मुलांची संख्या धक्कादायक आहे. लहान मुलं आणि तरुण डायबेटीस केटोएसिडोसिस (डीकेए) च्या प्रकरणांमध्ये देखील वाढ झाली आहे.
DKA ही डायबेटीसशी संबंधित एक गंभीर जीवघेणी समस्या आहे. उलट्या, पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं आणि वारंवार लघवी होणं ही त्याची लक्षणं आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष खूपच चिंताजनक आहेत आणि कोरोना महामारीच्या काळात आणि नंतर डायबेटीसच्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं आहे.