पावसाळा येताच वाढतो डेंग्यूचा धोका, वाचा यापासून बचावासाठी काय कराल अन् काय टाळाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 11:26 AM2024-07-04T11:26:51+5:302024-07-04T11:35:32+5:30

Dengue Fever Precautions : डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं आणि या दिवसात काय करू नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून डेंग्यूची लागण तुम्हाला होऊ नये. 

Dengue Fever Precautions : Things to do and avoid to prevent dengue | पावसाळा येताच वाढतो डेंग्यूचा धोका, वाचा यापासून बचावासाठी काय कराल अन् काय टाळाल?

पावसाळा येताच वाढतो डेंग्यूचा धोका, वाचा यापासून बचावासाठी काय कराल अन् काय टाळाल?

Dengue Fever Precautions : पाऊस आला की सगळ्यात जास्त धोका असतो तो डेंग्यू, मलेरिया, डायरियासारख्या आजारांचा. या दिवसात इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. डासांच्या चावण्यामुळे आजार होतात. सध्या भारतात बंगळुरूमध्ये डेंग्यूच्या खूप केसेस वाढत असल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर एका व्यक्तीचा मृत्यूही झाला. अशात डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं आणि या दिवसात काय करू नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून डेंग्यूची लागण तुम्हाला होऊ नये. 

पावसाळ्यात डेंग्यू का वाढतो?

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने आणि वातावरणात दमटपणा असल्याने डासांचं प्रजनन खूप वाढतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशन (WHO) च्या एका रिपोर्टनुसार, जगातील साधारण अर्ध्या लोकांना डेंग्यूचा धोका आहे आणि दरवर्षी सरासरी कोट्यावधी लोक याने संक्रमित होतात. अशात यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींची काळजी घेऊ शकता.

डेंग्यूपासून बचावासाठी काय कराल?

पूर्ण शरीर झाकेल असे कपडे

डेंग्यूपासून बचावासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे डास तुम्हाला चावणार नाही याची काळजी घ्या. यासाठी तुम्ही पूर्ण झाकलं जाईल असेल कपडे वापरू शकता. लांब बाह्याचा शर्ट, फुल पॅंट आणि सॉक्स वापरा.

घरात, आजूबाजूला स्वच्छता

डासांना तुमच्यापासून आणि तुमच्या घरापासून दूर ठेवण्यासाठी घरात स्वच्छता ठेवा. आजूबाजूलाही स्वच्छ ठेवा जेणेकरून डास होणार नाहीत. आजूबाजूला पाणी जमा होऊ देऊ नका. कुंड्या, कुलरमधील पाणी बदलत रहा. यात सगळ्यात जास्त डास होतात.

डासांना पळवण्यासाठी

डास खासकरून घरात सायंकाळी जास्त येतात. अशात डासांना घरातून पळवून लावण्यासाठी किंवा डास घरात येऊ नये म्हणून घरात मॉस्किो काईल, अगरबत्ती किंवा इतर गोष्टींचा वापर करा. डासांना पळवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय करू शकता.

डॉक्टरांना दाखवा

जर तुम्हाला आरोग्याबाबत कोणताही संशय आला जसे की, ताप आला, डोकेदुखी वाढली, मांसपेशींमध्ये वेदना होत असेल किंवा त्वचेवर लाल चट्टे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.

या दिवसात काय करू नये?

प्लेटलेट काऊंटकडे दुर्लक्ष

डेंग्यू झाल्यावर अनेकदा रूग्णाची प्लेटलेट लेव्हल कमी होते. प्लेटलेट अचानक खूप कमी होतात. अशात प्लेटलेट काऊंटसारख्या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध

कोणतीही समस्या झाल्यावर आपल्या मनाने घरी कोणतंही औषध घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेतल्याने डेंग्यूची लक्षण आणखी गंभीर रूप घेऊ शकतात.

एस्पिरिन घेणं टाळा

ताप किंवा अंगदुखी असं काही होत असेल आणि यापासून बचावासाठी एस्पिरिन किंवा इबुप्रोफेन घेत असाल तर असं करू नका. कारण ही औषधं डेंग्यूच्या रूग्णांमध्ये ब्लीडिंग किंवा इतर समस्यांचं कारण बनू शकतात.

डास असलेल्या ठिकाणांपासून अंतर

ज्या ठिकाणी जास्त डास असतात किंवा ज्या ठिकाणी खूप पाणी साचलं आहे अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. या ठिकाणी डासांचं प्रजनन होत असतं. अशा ठिकाणांवर जास्त वेळ थांबल्याने तुम्ही डेंग्यूच्या डासांच्या संपर्कात येऊ शकता.

Web Title: Dengue Fever Precautions : Things to do and avoid to prevent dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.