लवकरच डेंग्यूमुक्त भारत! स्वदेशी लस बनविण्यात यश, १० हजार लोकांवर चाचणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 09:15 AM2024-07-16T09:15:56+5:302024-07-16T09:16:07+5:30
डेंग्यूला रोखण्यासाठी लस निर्माण करण्यात आली असून याची चाचणी सुमारे १०३३५ नागरिकांवर घेण्यात येणार आहे.
पावसाळा आला की डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमालीची वाढते. यामुळे मृत्यूही होतात. डासांपासून डेंग्यूचा फैलाव होत असून याला आवर घालण्यासाठी आरोग्य प्रशासन लोकांमध्ये जागृती, फवारणी आदी करत असते. आता या डेंग्यूला रोखण्यासाठी लस निर्माण करण्यात आली असून याची चाचणी सुमारे १०३३५ नागरिकांवर घेण्यात येणार आहे.
डेंगीऑल नावाची लस बनविण्यात आली आहे. या लसीची चाचणी १८ ते ६० वर्षांच्या लोकांवर केली जाणार आहे. पॅनेसिया बायोटेकने अमेरिकेच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मदतीने ही लस बनविली आहे. या लसीची देशभरात १९ ठिकाणी चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती नारी-आयसीएमआरच्या संचालक डॉ. शीला गोडबोले यांनी दिली.
Panacea Biotech ने एका अमेरिकन संस्थेसोबत करार करून स्वदेशी लस तयार केली आहे. निष्क्रिय घटक वगळता लसीची विषाणू रचना NIH लसीसारखीच आहे. या लसीच्या चाचणीचा निकाल सुरुवातीच्या टप्प्यात आशादायक राहिला आहे. डेंग्यूच्या चारही प्रकारच्या विषाणूंवर ही लस प्रभावी ठरणार आहे. एकाच लसीमध्ये चारही विषाणूंची संरचना उपलब्ध आहे. यातून विषाणूजन्य जनुकांचे काही भाग काढून टाकण्यात आले आहेत. यामुळे या लसीमुळे स्वत:हून डेंग्यू होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.