कोरोनाच नाही तर डेंग्यूपासूनही करायला हवा बचाव, महागात पडू शकतात 'ही' लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 10:10 AM2020-04-23T10:10:05+5:302020-04-23T10:15:08+5:30
कोरोना आणि डेंग्यूची लक्षणं काही प्रमाणात सारखीच असतात.
हवामानात बदल झाल्यानंतर वेगवेगळे आजार पसरायला सुरूवात होते. गरमीच्या वातावरणात डेंग्यू आणि स्किन इन्फेक्शनची समस्या सर्वाधिक लोकांना जाणवते. त्यामुळे अनेकांना संक्रमणाचा धोका असतो. जागोजागी डासांचे प्रमाण वाढल्यामुळे लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. डासांचं प्रमाण वाढल्यानंतर मॉस्किटो रेपेलंट, उघड्यांवर पाणी साठवून न ठेवणं. या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे डेंग्यूच्या लक्षणांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण कोरोना आणि डेग्यूंची लक्षणं काही प्रमाणात सारखीच असतात. डेंग्यूचा डास चावल्यानंतर ३ ते ५ दिवसांनंतर डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. शरीरात ताप पसरण्याचा कालावधी ३ ते १० दिवसांचा देखील असू शकतो.
ताप
डेंग्यूचं सगळ्यात पहिलं लक्षण अचानक ताप येणं, थंडी वाजणं, अंगदुखी आहेत. या आजारात शरीर थकल्यासारखं वाटतं. सुरूवातील अंग गरम होतं. त्यावेळी शरीरातील तापमान सुमारे १०० ते १०२ °F असू शकतं. अशी समस्या जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्या, जास्त उशीर केल्यास समस्या वाढण्याची शक्यता असते.
डोळ्यांमध्ये वेदना
डोळ्यांमध्ये असहय्य वेदना होणं हे डेंग्यूचं लक्षण आहे. यात डोळे जड झाल्यासारखे वाटतात. हा त्रास लवकर बरा होणारा नसतो. जर तुम्हाला तापासोबतच डोळ्यांमध्ये जळजळ किंवा डोळे दुखण्याची समस्या जाणवत असेल तर तज्ञांशी संपर्क साधून तपासणी करून घ्या.
भूक न लागणं
सामान्य तापांप्रमाणेच डेंग्यूमध्येही भूक मरते. तुम्ही अंगदुखी, डोकेदुखीने इतके असह्य असता की, त्यामुळे तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा नसते. तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही.त्यामुळे भूक मरणे हा अगदी सर्वसाधारण त्रास या दिवसांमध्ये होतो.
याशिवाय अंगावर बारीक पुरळ येणे, हातपाय, डोके दुखणे, उलटी होणे या लक्षणे दिसतात. रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे, औषधांना रुग्णाचा प्रतिसाद न मिळणे असे परिणाम होतात. तसंच प्लेटलेट कमी झाल्यामुळे काहीवेळा रुग्णाच्या नाका-तोंडातून रक्तही येतं. त्यामुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी होते. यापैकी कोणतीही लक्षणं दिसत असल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.