डेंटिस्टच विसरला डेंटिस्टच्या तोंडात सुई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 01:25 PM2018-07-09T13:25:26+5:302018-07-09T13:31:42+5:30
शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून चूक झाल्याचे किंवा त्यांचे निदान चुकल्याचे आपण वाचले असेल. क्वचितप्रसंगी शल्यकर्म करताना वापरायचे साधन रुग्णाच्या शरीरातच विसरल्याची विचित्र बातमी आपण वाचली असेल. मात्र धारवाडमध्ये मात्र एका डेंटिस्टच्या चुकीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
धारवाड - शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून चूक झाल्याचे किंवा त्यांचे निदान चुकल्याचे आपण वाचले असेल. क्वचितप्रसंगी शल्यकर्म करताना वापरायचे साधन रुग्णाच्या शरीरातच विसरल्याची विचित्र बातमी आपण वाचली असेल. मात्र धारवाडमध्ये मात्र एका डेंटिस्टच्या चुकीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. हा दंतरोगतज्ज्ञ उपचार करताना सर्जिकल नीडल म्हणजे शस्त्रक्रीयेत वापरायची सुई रुग्णाच्या तोंडातच विसरला. विशेष म्हणजे ज्या रुग्णावर उपचार सुरु होते ती महिलाही डेंटिस्टच आहे. आता या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
धारवाडच्या एस पी मार्गा़वर डॉ. विनायक महेंद्रकर यांचा दवाखाना आहे. त्यांच्याकडे डॉ. सारिका यांनी दंतरोगावर उपचार घेतले. मात्र उपचारानंतर सारिका यांचा जबडा अत्यंतिक वेदनांनी दुखू लागला. वेदना असह्य झाल्यावर सारिका यांनी दुखऱ्या भागाची एक्स रेद्वारे तपासणी केली असता, आपल्या जबड्यात डॉ. विनायक यांनी सुई तशीच ठेवली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकाराने सारिका हादरूनच गेल्या. त्यावर सारिका यांनी डॉ. महेंद्रकर यांच्याकडे जाऊन याबाबत विचारणा केली. त्यावर महेंद्रकर यांनी गांभिर्याने प्रकरण हाताळण्याऐवजी अगदीच सहजपणे असं कधीकधी होतं, तुम्ही उद्या उपचाराला या असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सारिका पुन्हा त्यांच्या दवाखान्यात गेल्या असता तेथे महिंद्रकर उपस्थितच नव्हते.
महिंद्रकर यांच्या या बेफिकिर वृत्तीमुळे सारिका यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी दोन्ही डाँक्टरांना समोर बसवून समेट घडवण्याचा प्रयत्न केला. आपल्या तोंडातील सुई काढून टाकावी एवढीच मागणी असल्याचे सारिका यांनी स्पष्ट सांगितले. डॉ. महिंद्रकर यांनी ती मागणी मान्य केली व दोन्ही डॉक्टरांचे समाधान झाले.