डिप्रेशन : जवळचं कुणी निराश असेल तर घ्या काळजी, होऊ शकतो मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 12:07 PM2018-10-03T12:07:17+5:302018-10-03T12:08:03+5:30
एका नव्या शोधानुसार, डिप्रेशन लोकांना मृत्यूच्या दारात नेऊ शकतं. याला 'सायकोजेनिक डेथ' म्हटले जाते.
एका नव्या शोधानुसार, डिप्रेशन लोकांना मृत्यूच्या दारात नेऊ शकतं. याला 'सायकोजेनिक डेथ' म्हटले जाते. जिवंत असतानाही ही मरणासन्न अवस्था वेगवेगळ्या टप्प्यावर प्रभावित करते आणि हळूहळू व्यक्तीला मृत्यूच्या कवेत ढकलते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर अशी एखादी व्यक्ती असेल तर त्याची लगेच मदत केली पाहिजे, नाही तर ती व्यक्ती तुम्ही गमावूही शकता.
समाजापासून दूर होणे
व्यक्ती समाजात राहूनही समाजापासून दूर जाणे हे डिप्रेशनचं सुरुवातीचं लक्षण आहे. जर वेळीच हे लक्षात आलं नाही तर ती व्यक्ती पूर्णपणे समाजापासून दूर जाईल. ही समस्या युद्धातील रुग्णांमध्येही पाहिली जाते. कारण त्यांनी डोळ्यांसमोर अनेकांचं मरण पाहिलेलं असतं. यात व्यक्तीने भावना जाहीर करणे सोडलेले असते आणि त्याला त्याच्या आजूबाजूला काय सुरु आहे याचाही काही फरक पडत नाही.
निराशा
यात व्यक्ती आपल्या जीवनाने आणि त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींमुळे निराश असतात. ते खूप नकारात्मक असतात आणि स्वत:ला निकामी समजतात. त्यांची रचनात्मकता नष्ट होते आणि त्यांना स्वत:साठीही काहीच काम करायचं नसतं. छोट्यातलं छोटं काम त्यांना खूप जड वाटत असतं.
सायकिक एक्नेशिया
यात डिप्रेशनने ग्रस्त व्यक्तीच्या पेन रिसेप्टर्स काम करणं बंद करतात. अशात त्यांना कोणत्याही प्रकारच्या वेदना जाणवत नाहीत. ते कोणत्याही प्रकारच्या जखमेवरही प्रतिक्रिया देत नाहीत.
सायकोजेनिक डेथ
ही मृत्युपूर्वीची अवस्था असते. यात व्यक्तीला जगाशी काही देणं-घेणं नसतं. त्याला कशाचीच काही पडलेली नसते. त्यानंतर जवळपास २ ते ३ दिवसात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
काय ते ठिक होऊ शकतात?
डिप्रेशनमधून बाहेर येणं ही फार कठीण लढाई आहे. पण अशक्य नाही. यासाठी मेडिटेशन यांसारखे वेगवेगळे उपाय केले जातात. त्या व्यक्तीजवळ अशी व्यक्ती आणा जी त्याला आवडत असेल यानेही त्याच्यात फरक दिसू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.