चुकीच्या डाएटमुळे डिप्रेशनचा धोका! नवीन संशोधनात आल्या धक्कादायक बाबी समोर, करा 'हे' बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 03:36 PM2021-09-09T15:36:10+5:302021-09-09T15:37:06+5:30
एखाद्या मानसिक धक्क्यामुळे, एखाद्यासोबत झालेल्या वादामुळे किंवा अनपेक्षित घटना घडल्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं. याबाबत तुम्हाला माहित असेलच. पण या सगळ्यासोबतच तुमच्या आहाराचाही डिप्रेशनशी संबंध असल्याचं एका नव्या अभ्यासात समोर आलं आहे.
डिप्रेशन (Depression) येण्याची बरीच कारणं असतात. एखाद्या मानसिक धक्क्यामुळे, एखाद्यासोबत झालेल्या वादामुळे किंवा अनपेक्षित घटना घडल्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं. याबाबत तुम्हाला माहित असेलच. पण या सगळ्यासोबतच तुमच्या आहाराचाही डिप्रेशनशी संबंध असल्याचं एका नव्या अभ्यासात समोर आलं आहे.
पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन जर्नलमध्ये (Public Health Nutrition Journal) प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये याबाबत माहिती दिली आहे. या अभ्यासानुसार, जर तुमच्या डाएटमध्ये पोषक (Diet) तत्वांचा समावेश असेल, तर तुम्हाला डिप्रेशनसारखी समस्या होण्याची शक्यता कमी असते. तेच जर तुमच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटक नसतील, आणि तुमचा डाएटही अनहेल्दी असेल तर तुमचं डिप्रेशन वाढू शकतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुमच्या इम्युनिटीवर आणि शारिरीक वाढीवरही होतो. त्यामुळेच शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळण्यासाठी व्हिटॅमिन, मिनरल्स, अमिनो असिड्स आणि हेल्दी फॅट्सचा समावेश तुमच्या आहारात करणे गरजेचे आहे.
तुमचा मेंदू आणि गॅस्ट्रोइंटेस्टनल ट्रॅक्ट (Gastrointestinal tract) हे एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळेच तुमचा आहार आणि तुमचे इमोशन्स यांचा थेट संबंध असतो. गॅस्ट्रोइंटेस्टनल ट्रॅक्टला सेकंड ब्रेनही म्हटलं जातं. त्यामुळेच चांगल्या मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये बदल करणे आवश्यक आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यात चांगल्या मानसिक आरोग्यासाठी काय खावं आणि काय टाळावं याबाबत माहिती देण्यात आली आहे.
गोड आणि कॅफेनयुक्त पदार्थ टाळा
चांगल्या मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला कॅफेनयुक्त पेय (caffeine) टाळायला हवीत. कॉफी आणि तत्सम पेयांमुळे आपल्या स्लीप पॅटर्नवर परिणाम होतो. तसेच, यामुळे डीहायड्रेशन होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळेच मूड डिसऑर्डर्स कमी करण्यासाठी कॅफेनचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच डिप्रेशन टाळण्यासाठी साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. चॉकलेट आणि इतर गोड पदार्थ खाल्ल्याने थोड्या वेळासाठी तुमचा मूड चांगला होऊ शकतो. मात्र, काही वेळानंतर पुन्हा चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो.
वेळच्यावेळी जेवा
बऱ्याचदा आपण मूड चांगला नाही म्हणून जेवण टाळतो. मात्र, असं करणं तुमचं डिप्रेशन अधिक वाढवू शकतं. त्यामुळे जेवणाच्या वेळा पाळणं चांगल्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपल्या आहारात व्हिटॅमिन डी आणि ओमेगा ३ फॅटी असिड्स याचा मोठ्या प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. हे घटक भरपूर प्रमाणात असलेला आहार घेतल्यामुळे तुम्हाला डिप्रेशन येण्याची शक्यताही कमी होईल.