मासिक पाळी नसतानाही योनीतून रक्तस्त्राव होतोय? 'ही' असू शकतात कारणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 12:10 PM2018-08-11T12:10:49+5:302018-08-11T12:11:02+5:30
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. हा कोणताही आजार नाही किंवा त्यामध्ये घाबरण्यासारखंही काही नाही. पण अनेकदा मासिक पाळी आलेली नसतानाही योनीतून रक्तस्त्राव होतो.
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. हा कोणताही आजार नाही किंवा त्यामध्ये घाबरण्यासारखंही काही नाही. पण अनेकदा मासिक पाळी आलेली नसतानाही योनीतून रक्तस्त्राव होतो. याची अनेक कारणं असू शकतात. अनेक असे आजार असतात ज्यामुळे योनीतून रक्तस्राव होऊ शकतो. बऱ्याचदा हे आजार गंभीर नसतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते गंभीर होऊ शकतात. 'द हेल्थ साईट'ला स्त्रीरोग तज्ज्ञांनी मासिक पाळीशिवाय कोणत्या कारणांनी योनीतून रक्तस्त्राव होतो याबाबत माहिती दिली आहे. जाणून घेऊयात पाळीव्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव होण्याची कारणं...
गरोदरपणामुळे
योनीतून रक्तस्त्राव होण्याचं एक कारणं म्हणजे गरोदरपणा. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये योनीतून रक्तस्त्राव होण्याची समस्या होऊ शकते. याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
औषधांच सेवन
बऱ्याचदा नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांकडून सर्सास गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन केलं जातं. तसेच रक्त जाड होण्याची समस्या असलेल्या व्यक्तींनाही रक्त पातळ करण्यासाठी अनेक औषधं देण्यात येतात. यांसारख्या औषधांमुळे शरीरातील हार्मोन्समध्ये असंतुलन होते. त्यामुळे योनीतून रक्तस्त्राव होतो.
लैंगिक संक्रमित रोग
जर तुम्ही ह्यूमन पेपिलोमा वायरस किंवा एचपीवी यांसारख्या लैंगिक रोगांनी ग्रस्त असाल तर, तुम्हाला योनीमार्गातून रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते.
थायरॉइड
योनी मार्गातून रक्तस्त्राव होण्याचं आणखी एक कारण थायरॉइडही असू शकतं. थायरॉइडच्या ग्रंथी कमी सक्रीय झाल्यामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे योनीतून रक्तस्त्राव होतो.
यूटीआय
यूरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनही योनीमार्गातून रक्तस्त्राव होण्याचं एक कारण असू शकतं. जर हे इंफेक्शन जास्त प्रमाणात झालं असेल तर, तुम्हाला यूरिनसोबतच रक्तही येतं.
पीसीओएस
अनेक महिला पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोमने ग्रस्त असतात. त्यांच्या शरीरामध्ये हार्मोन्सचं असंतुलन अधिक असतं. त्यामुळे मासिक पाळी आलेली नसतानाही त्यांच्यामध्ये ब्लिडींग होण्याची समस्या अधिक असते.