मधुमेह आणि डिमेन्शियाचे समिकरण रुग्णासाठी घातक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 04:42 PM2018-10-05T16:42:36+5:302018-10-05T16:42:56+5:30
हायपोग्लासिमिया टाळण्यासाठी रुग्णांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांना डिमेन्शिया आणि मधुमेहाचा मोठा धोका असतो.
मुंबई- मधुमेह आणि डिमेन्शिया हे दोन्ही आजार एकाचवेळेस असणाऱ्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यापासून ते थेट मृत्यूपर्यंत धोका संभवतो अशी भीती नव्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. या अभ्यासात ६५ आणि ६५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या टाइप-१, टाइप-२ हे मधुमेह असणाऱ्या २०,००० व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता, तसेच या लोकांच्या रक्ताची पातळी पहिल्यांदा खालावण्याच्या प्रसंग नोंदवल्यानंतर त्यांचे निरीक्षण करण्यात आले. ज्या लोकांना मधुमेह आणि डिमेन्शिया हे दोन्ही आजार असणाºयांना केवळ मधुमेह असणाºया लोकांपेक्षा हायपोग्लासिमिया (रक्तातील साखरेची पातळी घसरणे)मुळे मृत्यूचा धोका ६७ टक्के जास्त धोका असल्याचे निरीक्षणात लक्षात आले.
हायपोग्लासिमिया हा मधुमेह आणि डिमेन्शिया असणाऱ्या ज्येष्ठांच्या मृत्यूच्या न ओळखल्या गेलेल्या कारणांपैकी एक असल्याचे मत या अभ्यासाच्या लेखिका डॉ. कॅथरिना मॅटिशेंट यांनी व्यक्त केले. त्या इंग्लंडमधील नॉर्विच मेडिकल स्कूल येथे कार्यरत आहेत. या प्रकारच्या रुग्णांनी साखर कमी करण्याच्या लक्ष्यांना दूर ठेवून ग्लुकोज मॉनिटरच्या मदतीने हायपोग्लासिमियाचे निदान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे डॉ. कॅथरिना यांनी अभ्यासानंतर निरीक्षण मांडले.
बर्लिन येथे झालेल्या युरोपियन असोसिएशन फॉर स्टडी आॅफ डायबेटिसच्या वार्षिक बैठकीमध्ये या अभ्यासावर आधारित शोधनिबंध वाचून दाखवण्यात आला. डिमेन्शियाचा धोका कमी करणे, रुग्णाची अधिकाधिक काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. डिमेन्शिया वाढण्यासाठी डायबेटिस कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे या दोन्ही आजारांचा एकमेकांशी संबंध जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे असे मत अल्झायमर सोसायटीचे संशोधन प्रमुख जेम्स पिकेट यांनी मांडले आहे. डायबेटिस असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या रक्तातील साखर कमी होणे धोकादायकच आहे आणि जर त्या व्यक्तीला डिमेन्शिया असेल तर ते आणखीच धोकादायक असेही पिकेट म्हणाले. रक्तातील साखरेची पातळी घटण्याचा विचार करता त्यावर काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.