डायबिटीसमुळे डोळे जातील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 02:12 PM2023-07-30T14:12:09+5:302023-07-30T14:33:31+5:30
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने डायबिटीसचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. डायबिटीसमुळे दृष्टी कमी होणे आणि काही वेळा दृष्टी कायमस्वरूपी जाण्याची भीती आहे.
डॉ. प्रीतम सामंत, रेटिना स्पेशालिस्ट, हिंदुजा हाॅस्पिटल -
ही दिवसांपूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने देशातील नागरिकांमध्ये डायबिटीसचे प्रमाण किती झपाट्याने वाढत आहे, याबद्दल लॅन्सेटमध्ये शोधनिबंध सादर केला होता. डायबिटीसचा शरीरातील सर्व अवयवांवर दुष्परिणाम दिसून येतो. आपल्याकडे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्यावर डॉक्टरकडे जाण्याची धावपळ सुरू होते. विशेष म्हणजे अनियंत्रित साखरेच्या प्रमाणामुळे डोळ्याला रेटिनोपॅथी नावाचा आजार होऊन दृष्टी कमी होणे आणि काही वेळा दृष्टी कायमस्वरूपी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात येतात आणि काहीही करून डोळा वाचवा, असे सांगतात. परंतु, त्यावेळी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. डोळ्याला मोठ्या प्रमाणात इजा झालेली असते. या गोष्टी टाळायच्या असतील तर ज्या व्यक्तीला डायबिटीस आहे, त्यांनी वर्षातून किमान दोन वेळा डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे चष्म्याच्या दुकानात जाऊन डोळे तपासू नये. त्या दुकानात असणारे तज्ज्ञ डोळ्याच्या आजाराची माहिती देऊ शकत नाहीत. कारण ते त्यामधील तज्ज्ञ नसतात. केवळ डोळ्यात टॉर्च मारून या आजाराचे निदान करता येत नाही. याकरिता डोळ्यांच्या तज्ज्ञांकडे जाणे गरजेचे आहे. रेटिनाचा (दृष्टिपटल) आजार तुम्हाला जडला आहे की नाही, हे पाहण्यासाठी डोळ्यांमध्ये औषध टाकून वैद्यकीय भाषेत ज्याला बुबुळ डायलेट करून बघितले जाते आणि त्यानंतर रेटिना स्पेशालिस्ट डोळ्यातील रेटिना किती खराब झाला आहे, हे सांगू शकतो.
‘हे’ लक्षात घेतले पाहिजे
काही डायबिटीस रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात डॉक्टरकडे येतात. त्यावेळी डोळ्यांतील रक्तवाहिन्या फुटून डोळ्यांमध्ये गाठ तयार होते. त्यामुळे रेटिनाच्या पडद्याला सूज येते. या अशा परिस्थितीत रुग्णांची नजर खूपच कमी झालेली असते. त्यावेळी मात्र अशा रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसतो.
आपण या ठिकाणी रेटिनोपॅथीच्या आजारात एक लक्षात घेतले पाहिजे, या आजारात आहे ती नजर वाचविण्यास मदत होते. गेलेली नजर परत येत नाही. कॅटरॅक्टचे ऑपरेशन केल्यानंतर रुग्णांना चांगली नजर येते.
या आजारात तसे होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे डायबिटीसचा आजार असणाऱ्या रुग्णांनी वेळच्या वेळी डोळे तपासून निदान करून उपचार घेतले, तर डोळ्याची नजर चांगली ठेवण्यास मदत होते.
अनेकवेळा या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात केवळ डायबिटीस, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवून डोळ्याची नजर वाचविता येणे शक्य असते. डोळ्यात फार तर काही ड्रॉप्स टाकावे लागतात.
मात्र, काही रुग्ण या आजाराच्या ‘मिडल स्टेज’ला येतात. त्यावेळी काही चाचण्या कराव्या लागतात. त्यामध्ये डोळ्यांची अँजिओग्राफी आणि डोळ्यांचा स्कॅन ज्याला आम्ही ओसीटी स्कॅन म्हणतो.
या दोन तपासण्यांनंतर रेटिना किती खराब झाला आहे, हे समजते. त्यानंतर त्या आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णांना डोळ्यात इंजेक्शन घ्यावी लागतात.
सुरुवातीच्या काळात दर महिन्याला त्यानंतर ती कमी करत बंद केली जातात. यामुळे आहे ती नजर वाचविण्यात मदत होते. इंजेक्शन घेण्याची प्रक्रिया ही दहा मिनिटांत पार पडते. त्यासोबत काही वेळा लेसरचे उपचार घ्यावे लागतात.