डायबिटीस रुग्णांनो सावधान! जास्त वाढला तर होऊ शकते किडनी फेल, वेळीच घ्या तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 05:37 PM2022-06-30T17:37:03+5:302022-06-30T17:37:28+5:30

मधुमेह नियंत्रणात आणला नाही तर त्याचा परिणाम डोळे, किडनी इत्यादी अवयवांवर होऊ शकतो. विशेषत: किडनीवर तर मधुमेहाचा जास्त परिणाम होऊ शकतो.

diabetes can lead to kidney failure | डायबिटीस रुग्णांनो सावधान! जास्त वाढला तर होऊ शकते किडनी फेल, वेळीच घ्या तज्ज्ञांचा सल्ला

डायबिटीस रुग्णांनो सावधान! जास्त वाढला तर होऊ शकते किडनी फेल, वेळीच घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Next

मधुमेह म्हणजेच डायबेटिस (Diabetes) हा खरं तर सर्वसामान्य आजार आहे असं म्हटलं जातं. पण वेळीच लक्ष दिलं नाही तर त्यामुळे जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. मधुमेह नियंत्रणात आणला नाही तर त्याचा परिणाम डोळे, किडनी इत्यादी अवयवांवर होऊ शकतो. विशेषत: किडनीवर तर मधुमेहाचा जास्त परिणाम होऊ शकतो. याचबद्दलची अधिक माहिती आज तकच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

डायबेटिस (Diabetes) असणाऱ्यांना डायबिटिक किडनी डिसीज (Diabetic kidney disease) म्हणजेच किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात. यामध्ये किडनी फेल होण्याचीही शक्यता असते. एखाद्या आजाराची सुरुवात होते तेव्हा त्याची काही ना काही लक्षणं नक्की जाणवायला लागतात. ही लक्षणं वेळीच ओळखली तर धोका टाळता येतो. याची लक्षणं चेहऱ्यावर दिसायला लागतात, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. या लक्षणांवरूनच त्या आजारावर उपचार केले जाऊ शकतात. काही आजारांची लक्षणं मात्र खूप उशिरा लक्षात येतात.

डायबेटिसमुळे होणाऱ्या किडनीच्या आजाराची (Diabetic kidney disease) लक्षणंही अशीच आहेत. मधुमेह असणाऱ्या 3 जणांपैकी प्रत्येकी एकाला हा किडनीचा आजार होतो. यामध्ये किडनीचे फिल्टर (ग्लोमेरुली) खराब होतात आणि किडनीमधून रक्तातून युरिनमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन सोडलं जातं. ही परिस्थिती अर्थातच शरीरासाठी अत्यंत धोकादायक असते. डायबेटिसची सुरुवातीची लक्षणं धोकादायक नसतात पण काही काळानंतर मात्र ही परिस्थिती धोकादायक होऊ शकते. जर मधुमेहाचं प्रमाण वाढलं तर याची लक्षणं चेहऱ्यावरही दिसायला लागतात.

कोणाला जास्त धोका?
टाईप वन डायबेटिसच्या (Type One Diabetes) रुग्णांना टाईप टू डायबेटिसच्या (Type Two Diabetes) रुग्णांपेक्षा किडनीशी संबंधित आजार होण्याचा जास्त धोका असतो. टाईप वन डायबेटिस रुग्णांमध्ये किडनीचे आजार अगदी सर्वसामान्य आहेत. पण टाईप टू डायबेटिसच्या रुग्णांमध्ये ही समस्या आता जास्त प्रमाणात दिसते. डायलिसीसवर असणाऱ्या पाच रुग्णांपैकी प्रत्येकी एका व्यक्तीला डायबेटिस किडनीचा आजार होऊ शकतो.

लक्षणे कोणती?
डायबेटिक किडनी आजाराची लक्षणं डोळ्यांच्या आसपास दिसायला लागतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जर मधुमेहाचं प्रमाण वाढलं तर डोळ्यांच्या आसपास सूज येते. याचा थेट परिणाम किडनीवर होत आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजेच डायबेटिसमुळे होणाऱ्या किडनीच्या आजाराची सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्याशिवाय डायबेटिक किडनीच्या आजाराची आणखीही काही लक्षणं आहेत-

- विचार करण्याच्या शक्तीवर परिणाम होतो (विचारशक्तीत अडथळा)

- भूक न लागणं

- वजन कमी होणं

- कोरडी, खाज येणारी त्वचा

- स्नायू आखडणं

- पाय – घोट्यांवर सूज

- सारखी लघवी लागणं

- लघवी पिवळी होणं

- सतत आजारी पडणं

यापैकी कोणतीही लक्षणं आढळली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. याचं कारण म्हणजे जर किडनीवर परिणाम झाला तर त्याचा परिणाम शरीराच्या अन्य भागांवरही व्हायला सुरुवात होते. अन्य आजारही त्यामुळे उद्भवू शकतात. एकदा किडनी खराब व्हायला सुरुवात झाली तर काहीवेळेस गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

किडनी फेल (Kidney Failure) होण्याचं मुख्य कारणही डायबेटिस असू शकतं. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राखणं. त्यासाठी योग्य तो आहार घेणं, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या गोष्टींचं पालन करणं महत्त्वाचं आहे.

Web Title: diabetes can lead to kidney failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.