डायबिटीसचा तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलशी आहे जवळचा संबंध, कसा? घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 05:27 PM2022-09-18T17:27:44+5:302022-09-18T17:51:07+5:30
डायबेटिसमुळे कोलेस्टेरॉलची लेव्हल कशी वाढते, या विषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
सध्याच्या काळात सर्व वयोगटातले लोक डायबेटिस अर्थात मधुमेह (Diabetes) आणि हाय कोलेस्टेरॉलच्या (High cholesterol) समस्येमुळे त्रस्त आहेत. अर्थात यामागे अनेक कारणं आहेत. बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, बैठं काम, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि अनुवंशिकता आदी कारणांमुळे डायबेटिसची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
अनेक लोकांना डायबेटिस टाइप -2 मुळे कोलेस्टेरॉलची समस्या जाणवत आहे. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल; पण या दोन्ही आजारांचा परस्पराशी संबंध आहे. कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तात आढळणारा एक पदार्थ आहे, जो हॉर्मोन्स निर्मितीसाठी मदत करतो. जेव्हा कोलेस्टेरॉलची लेव्हल सामान्यपेक्षा जास्त असते तेव्हा ते रक्त वाहिन्यांमध्ये जमा होते आणि रक्त प्रवाहावर परिणाम करू लागते. यामुळे हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. डायबेटिसमुळे कोलेस्टेरॉलची लेव्हल कशी वाढते, या विषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
डायबेटिस आणि कोलेस्टेरॉलचा संबंध:
'वेब एमडी`च्या अहवालानुसार, डायबेटिस टाइप -2 चा सामना करत असलेल्या बहुतांश लोकांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल अर्थात एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची अर्थात एचडीएलची पातळी कमी होते. जेव्हा डायबेटिस असलेल्या रुग्णाची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा हाय कोलेस्टेरॉलची समस्या दिसू लागते. परंतु, काही वेळा ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात असतानाही कोलेस्टेरॉल वाढू शकतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लठ्ठपणा असलेल्या डायबेटिस टाइप -1 च्या रुग्णांनादेखील कोलेस्टेरॉलचा त्रास होऊ शकतो.
70 टक्के रुग्णांना आहे ही समस्या:
डायबेटिसमुळे जेव्हा गुड कोलेस्टेरॉल कमी होतं आणि बॅड कोलेस्टेरॉल तसंच ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढते, तेव्हा या स्थितीला डायबेटिक डायस्लिपिडेमिया असं म्हणतात. डायबेटिस टाइप -2 असलेल्या सुमारे 70 टक्के लोकांना हा त्रास होतो. त्यातच जर ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणाबाहेर असेल तर हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असतो. ही स्थिती दूर ठेवण्यासाठी डायबेटिसच्या रुग्णांनी ब्लड शुगर लेव्हलसोबतच कोलेस्टेरॉलची तपासणी करणं गरजेचं आहे.
ही स्थिती कशी टाळायची?
डायबेटिसच्या रुग्णांनी आपली ब्लड शुगर लेव्हल नेहमी नियंत्रणात ठेवावी. यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता कमी होते. या रुग्णांनी डायबेटिस आणि कोलेस्टेरॉल अशा दोन्ही गोष्टींवर एकत्रित उपचार घेणं आवश्यक आहे. उत्तम जीवनशैली, सकस आहार आणि रोज व्यायाम करून या समस्या काही प्रमाणात आटोक्यात आणल्या जाऊ शकतात. उपचारांमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नये अन्यथा हृदयविकाराची समस्या निर्माण होऊ शकते. त्यासोबत हॉर्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही वाढू शकतो.