चवळी खाल्ल्याने डायबिटीस आणि पोट साफ न होण्याची समस्या होईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 11:09 AM2019-12-24T11:09:23+5:302019-12-24T11:14:57+5:30
आपण घरगुती वापरात अनेक असे पदार्थ पाहत असतो. तसंच त्यांचं सेवन करत असतो. आरोग्याच्या दृष्टीने काही पदार्थ खूप लाभदायक ठरत असतात.
आपण घरगुती वापरात अनेक असे पदार्थ पाहत असतो. तसंच त्यांचं सेवन करत असतो. आरोग्याच्या दृष्टीने काही पदार्थ खूप लाभदायक ठरत असतात. त्यांचा वापर कसा करून घ्यायचा आणि तुम्हाला कोणत्या आजारापासून या घटकांचे सेवन केल्यानंतर सुटका मिळू शकते हे माहीत नसल्यामुळे आपण घरातल्या गोष्टींकडे फारसं लक्ष न देत नाही. आहारात आपण अनेक कडधान्यांचा समावेश करत असतो. त्यापैकीच एक म्हणजे चवळी. उसळ करताना चवळीचा वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊया चवळीचे आरोग्यासाठी असलेले फायदे. चवळीचा आहारात मोठ्या प्रमाणावर समावेश करुन तुम्ही आजारांना स्वतःपासून दूर ठेवू शकता.
मधुमेहासाठी फायदेशीर
चवळी हा कडधान्याचा प्रकार मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो. मधुमेहच्या रुग्णांनी आहारात चवळीचा समावेश केल्यास शरीरासाठी लाभदायक ठरतं. कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण मिळतं. म्हणूनच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळत असल्याने या भाजीचं आवर्जून सेवन करावं.
पोट साफ होणं
चवळीमध्ये सोल्यूबल फायबर असतात. तसंच फायबरचं प्रमाण उच्च असल्यामुळे पाचनशक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं सेवन केल्याने पोट व्यवस्थीत साफ होतं. त्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकाल.
वजन कमी करण्यासाठी
चवळीचा भाजी वजन कमी करण्यास मदत करते. कारण यात असलेलं प्रोटिन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करण्यास मदत करते. तसंच शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अतिरिक्त वाढलेली चरबी कमी करण्यात मदत करते.
गरोदर महिलांसाठी उपयुक्त
गरोदर महिलांनी चवळीचं आवर्जून सेवन करावं. कारण गरोदरपणात होणारी कॅल्शिअमची झीज भरून काढते. आणि बाळाची योग्य वाढ करते. प्रसूतीला त्रास होत नाही तसंच प्रसूतीनंतर आईला भरपूर दूध येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
हृदय चांगले राहते.
शरीरात लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींना चवळी या कडधान्याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. चवळीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे हदयाशी निगडीत आजारांपासून दूर राहता येतं.