Diabetes Symptoms: डायबिटीस आहे का हे कधी चेक करायचं?... 'ही' आहेत मधुमेहाची लक्षात न येणारी लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 12:17 PM2022-12-30T12:17:02+5:302023-01-06T18:01:05+5:30
Diabetes Symptoms : डायबिटीस रुग्णांची संख्या देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहे.
- डॉ. नितीन पाटणकर (एम. डी., विस्डम क्लिनिक)
मुंबई : मधुमेह म्हणजेच डायबिटीस... याला शहरी जीवनाची आपत्तीसुद्धा म्हटले जाते. डायबिटीस रुग्णांची संख्या देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, हा आजार भारतात इतक्या वेगाने पसरत आहे की, त्याच्या रुग्णांची संख्या ५ कोटींच्या घरात पोहोचली आहे. धकाधकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार ही डायबिटीसची कारणं आहेत. या आजाराच्या रुग्णांनी आहारावर नियंत्रण ठेवले नाही तर त्यांच्या समस्या वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आपल्याला डायबेटिस आहे का, हे चाचणी केल्यावरच कळतं. पण, ही चाचणी नेमकी कधी करायची, काय लक्षणं दिसल्यावर लॅबमध्ये जायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
मधुमेहाची लक्षात न येणारी लक्षणं खालीलप्रमाणेः
>> काल रात्री भरपूर जेवण झालं. जेवण अगदी अंगावर आलं. गुंगी आली. झोप लागली पण नेहमीप्रमाणे शांत झोप नाही. सारखी स्वप्नं पडत होती. सकाळी उठल्यानंतर डोकं जड. जणू काही हॅंगओव्हर असावा. असं होत असल्यास डायबिटीस नाही ना, ते चेक करून घेणे इष्ट.
>> रात्री झोपताना तळपायांना कंड सुटणे. किती खाजवलं तरी कंड न शमणे. हे त्वचेच्या कोरडेपणामुळे घडते. त्याला मॅाइश्चरायजर लावल्याशिवाय जात नाही. असं होत असल्यास डायबिटीस नाही ना ते चेक करावं.
>> रात्री झोपेत पायाला मुंग्या येऊन जाग येणे, सकाळी उठताना हातापायाला मुंग्या जाणवणे, सकाळी जागे होताना हातात ताकद नसल्यागत वाटणे, हातापायांची आग होणे, असं होत असल्यास डायबिटीस नाही ना ते चेक करून घ्या.
>> रात्री झोपेत लघवीला लागल्याची स्वप्नं पडणे, त्या स्वप्नात लघवी करताना ती प्रत्यक्षात होऊन जाग येणे, रात्री लघवीसाठी अनेकदा झोपेतून उठावे लागणे, लघवीला वरचेवर जळजळ होणे, असं होत असल्यास डायबेटीस नाही ना ते तपासून पाहा.
>> डोळ्यांचा नंबर अचानक बदलला किंवा काही महिन्यातच नवीन काढलेला नंबर पुन्हा बदलला असं होत असल्यास डायबिटीस नाही ना हे एकदा तपासून घ्या.
>> कारण नसताना, प्रयत्न न करताच वजन कमी होणे, पाळीचे त्रास, मानेभोवती काळा पट्टा तयार होणे, खूप भूक लागणे, जेवण झाल्यानंतर दोन तासात एकदम हातपाय थरथरणे, घाम फुटणे, साखर खावीशी वाटणे असं होत असल्यास डायबिटीसची चाचणी करून घेणे योग्य.
>> सतत थकवा येणे, उदासीन वाटणे, भिरभिरते विचार डोक्यात राहणे, कामात फोकस नसणे, लैंगिक सुख उपभोगण्यात अडचणी येणे असं होत असल्यास डायबिटीस नाही ना ते चेक करून घेणे.