चालतानाचं जगणं अनुभवलंय कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:57 PM2017-10-28T16:57:10+5:302017-10-28T16:58:07+5:30
शरीर- मनाला नवी ऊर्जा देणारी एक चेतना..
- मयूर पठाडे
चालण्याचं महत्त्व आता काही कोणी कोणाला सांगायची गरज नाही. लहानापासून ते मोठ्यापर्यंत साºयांनाच ते माहीत आहे. याच सदरात आपणही चालण्याचं महत्त्व आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी ते उपयोगी ठरतं ते आपण पाहिलं आहे.
पण चालायचं कसं? त्याच्या तांत्रिक बाबींविषयी जाऊ द्या, म्हणजे रस्त्यावर चालायचं कि माती असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर, कोणते शूज घालावेत.. या गोष्टीही महत्त्वाच्या आहेतच, पण आम्हाला सांगायचंय, ते चालण्याच्या श्वासाविषयी..
आता तुम्ही म्हणाल, चालण्याचा श्वास ही काय जगावेगळी गोष्ट तुम्ही आणलीत?
त्याचा थोडक्यात अर्थ असा, चालणं हादेखील तुमचा श्वास झाला पाहिजे. थोडा वेळ आपला श्वास बंद करून पाहा, श्वासाचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल.
तसंच चालताना आपल्या जाणिवा, संवेदना या चालण्यासोबत ठेवा.
व्यायामासाठीचं चालणं वेगळं आणि चालतानाचं जगणं वेगळं.
चालताना आपल्या प्रत्येक पावलासोबत तुम्ही असा. दिवसभर तुम्ही असंच केलं पाहिजे असं नाही. दिवसातली अगदी पाच मिनिटंही पुरेशी आहेत. पण जाणीवपूर्वक लक्ष द्या आपल्या चालण्याकडे. आपण उचललेलं पाऊल.. डावा पाय उचलतोय, मग उजवा.. तो खाली टेकवतोय. पाय उचलतानाचं ते वजन अनुभवा. पाय खाली ठेवल्यावर त्याचा स्पर्श अनुभवा. एका पायाचं वजन दुसºया पायावर शिफ्ट होतानाचा तो अनुभव, ती संवेदना लक्षात घ्या..
अर्थातच आपण कुठे चाललोय, कोणत्या ठिकाणी आपल्याला जायचंय ते याठिकाणी महत्त्वाचं नाही. मुळात त्याकडे फारसं लक्ष देऊच नका, पण चालताना आपल्या पायातली, आपल्या शरीरातली, आपल्या मनातली संवेदना अनुभवा..
बस्स एवढं केलं तरी एक नवी ऊर्जा तुमच्या शरीर-मनात संचारेल. ती शब्दांत व्यक्त नाहीच करता येणार..
बघा चालण्यातलं जगणं जगून..