रोज चालता का तुम्ही १०,००० पावलं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 05:54 PM2017-11-21T17:54:44+5:302017-11-21T17:56:13+5:30
नाही? मग करा की सुरू हळूहळू..
- मयूर पठाडे
व्यायाम सुरू करा, फिरायला जात जा.. असं डॉकटरांनी सांगितलं आणि त्याहीपेक्षा आपली तब्येत कुरकुर करायला लागली, उठता बसता कुठली ना कुठली दुखणी सतावायला लागली की मग आपल्याला खरोखरच वाटायला लागतं, हो, आपण व्यायाम करायलाच पाहिजे. बºयाचदा व्यायामाची ही सुरुवात होते चालण्यापासून. ते योग्यही आहे. अर्थात त्याचीही बरीच काळजी घ्यावीच लागते. म्हणजे तुम्ही कुठे चालतात, कोणत्या ठिकाणी चालतात, त्याची वेळ, पायात कोणते शूज तुम्ही घातले आहेत.. अशा अनेक गोष्टींचा आणि आपल्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे.
चालायचं हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण किती चालायचं?.. कोणालाच त्याविषयी काहीच सांगता येत नाही. प्रत्येक जण मग आपल्या मनाप्रमाणे आपलं स्वत:चं प्रमाण ठरवून टाकतो.
आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी आणि वेट लॉससाठी चालायलाच पाहिजे.
पण किती?
शास्त्र सांगतं, सर्वसाधारण माणसानं रोज दहा हजार पावलं चालायला पाहिजे.
तुम्हाला वाटेल, सोप्पं आहे, म्हणजे त्यात फार कठीण असं काही नाहीच, पण मनानं ठाम ठरवल्याशिवाय ते सहजपणे जमणंही शक्य नाही.
तुम्ही रोज किती चालता, हे पाहण्यासाठी तुमच्याकडे पेडोमीटर असलं तर ठीकच आहे, पण दहा हजार पावलं म्हणजे नेमकं किती अंतर?
सोप्पं करूनच सांगतो..
सर्वसाधारणपणे दोन हजार पावलांचं अंतर होतं सुमारे १.६ किलोमीटर. दहा हजार पावलं म्हणजे रोज साधारण आठ किलोमीटर!
रोज तुम्ही जर साधारण आठ किलोमीटर अंतर चालत असाल, तर तुमचं सर्वांगीण आरोग्य, तुमचं हृदय आणि तुमचं वजन आटोक्यात आणि मापात ठेवण्यासाठी ते पुरेसं आहे..
मग करता सुरू? उद्यापासून?..
नक्की, पण आधी गाडी हळूहळूच चालू द्या. हजार पावलं, दोन हजार पावलं.. मग पुढचा पल्ला गाठा..