बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने नाक धुतले का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:42 AM2023-12-19T10:42:20+5:302023-12-19T10:42:32+5:30
शहरात होणारी बांधकामे, वाढलेली वाहने, लहान मोठे कारखान्यातून सोडण्यात येणारा धूर आदींमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई
राज्यात जवळपास सर्वच शहरांत वायू प्रदूषण वाढले आहे. नागरिकांनी आरोग्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार असून बाहेरून आल्यानंतर प्रत्येकाने कोमट पाण्याने नाक धुणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. रस्ते वाहतूक, वाहने, कारखान्यातून सोडण्यात येणारे धूर, कोळसा, लाकूड, वाळलेले गवत यांचे जाळणे, बांधकामे व धुलिकणात वाढ आदींमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. वायू प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर झाला असून ॲलर्जी सारख्या प्रकारात वाढ होऊन सर्दी व खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे.
शहरात वायू प्रदूषण वाढले
शहरात होणारी बांधकामे, वाढलेली वाहने, लहान मोठे कारखान्यातून सोडण्यात येणारा धूर आदींमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली. गेल्या महिन्यात प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्यावर, न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने बांधकामावर निर्बंध घालून त्यांना नोटिसा दिल्या आहेत. तसेच धुलिकणात वाढ झाल्याने, पाणी शिंपडण्याचे काम करण्यात आले.
भरपूर पाणी पिणे आवश्यक
वायू प्रदूषणामुळे ॲलर्जी, सर्दी-खोकला, दमा आदीच्या रुग्णांत वाढ होते. त्यापासून बचाव होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
काय काळजी घ्याल?
मास्क वापरा : वायू प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडल्यावर मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पाण्याने नाक स्वच्छ करा : बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने नाक स्वच्छ केल्यास, संसर्ग व सर्दी पासून बचाव होतो. नाकात गेलेले धूलीकण धुवून निघतात.
मुंबई आणि परिसरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. बांधकामे वाढली असून विविध विकास कामे सुरू झाल्याने धुलिकणात प्रचंड वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये देखील वाढ झाली आहे. थंडीमुळे अनेकदा नाक जाम होते. वायू प्रदूषणात वाढ झाल्याने, नागरिकांनी कोमट पाण्याने नाक स्वच्छ करणे, मास्क वापरणे, गरज असेल तरच घराबाहेर पडणे आवश्यक आहे. अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान-नाक-घसा विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय