आहारातून मनाकडे !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2016 05:09 PM2016-12-09T17:09:36+5:302016-12-09T17:09:36+5:30
आपले आरोग्यपूर्ण जीवन मुख्यत: तीन गोष्टींवर अवलंबून असते. निद्रा, ब्रम्हचर्य आणि आहार. सध्या आधुनिकतेच्या जगात या तिन्ही बाबींमध्ये अनियमितता आढळून येत असून, यांच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
Next
आपले आरोग्यपूर्ण जीवन मुख्यत: तीन गोष्टींवर अवलंबून असते. निद्रा, ब्रम्हचर्य आणि आहार. सध्या आधुनिकतेच्या जगात या तिन्ही बाबींमध्ये अनियमितता आढळून येत असून, यांच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
आहार अर्थात परिपूर्ण अन्न. आपण मुखाद्वारे सेवन केलेला आहार आपल्या भारतीय संस्कृतीत ‘जसे अन्न तसे मन’ किंवा ‘जसा आहार तसा विचार’ या पायाभूत सिद्धांतावरच अवलंबून असावा. एक चांगला आणि समतोल आहार अशा अन्न घटकांचा समन्वय आहे, जो शरीराला आवश्यक सर्व जीवन तत्त्व पुरवितो. आहारामध्ये विविध अन्नघटक योग्य प्रमाणात एकत्रित केले जातात, जेणेकरुन शारीरिक पोषण, ऊर्जा उत्पादन तसेच मनाचेही पोषण होईल. चांगले मन व शरीराचे पोषण हे अन्न पचन करण्याची क्षमता, अन्नाचे प्रमाण व स्वरुप यावर अवलंबून असते. यासोबतच एखादा आजार, झोपेची पद्धत, मानसिक अवस्था यांचा अन्नपचनावर परिणाम होत असतो. आपले सर्व जीवनीय कार्य आहारावरच आधारित असते. मनुष्याला वृक्षवल्लींप्रमाणे सूर्यावर अवलंबून ऊर्जा मिळविता येत नाही, म्हणूनच देश, काळ, ऋतू, स्वभाव, प्रकृति, मात्रा, रुची आणि निद्रेनुसार आहारामध्ये विविधता येते.
आयुर्वेदानुसार आरोग्य टिकविण्यासाठी तसेच रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनाची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणूनच आयुर्वेदाने मनाची सत्त्व, रज व तम अशी तीन वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ज्याप्रमाणे आपण आहार सेवन करतो त्यानुसार मनाची वैशिष्ट्ये ठरत जातात, वाढतात किंवा कमी होतात. सात्विक, राजसिक आणि तामसिक आहाराचा मनाच्या या त्रिवैशिष्ट्यांशी समीप संबंध आहे. मनाच्या या तीन भावांवरच आपले व्यक्तिमत्त्व घडून येते.
काय आहेत ही त्रिवैशिष्ट्ये
सात्विकता-
नेहमी श्रेष्ठ विचार, श्रेष्ठ बोल, श्रेष्ठ भावना, श्रेष्ठ भावना, श्रेष्ठ वाचा, श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ स्मृती तसेच सर्व परिस्थितींमध्ये स्थिरता, उत्साह व आनंद.
राजसिकता-
कधी श्रेष्ठ तर कधी साधारण विचार, वृत्ती, बोल, स्मृती, भावनांमध्ये परिस्थितीनुसार बदलाव. उत्साह साधारण व चिडचिडेपणा जास्त.
तामसिकता-
नकारात्मक विचार, भावना, बदला घेण्याची वृत्ती तसेच क्रोध, लोभ द्वेष, इर्षा, अहंकार जास्त. परिस्थितीचा मनावर लगेच दुष्परिणाम. उत्साह कमी आणि आळस जास्त.
आहाराचे तीन प्रकार
१) सात्विक : ताजे अन्न, सर्व प्रकारचे धान्य, कडधान्ये, डाळी, फळे, फुले, दूधाचे पदार्थ आणि सर्व रसांचे समतोल प्रमाण.
२) राजस : शिळे पदार्थ, लोणचे, पापड, तेलकट पदार्थ, अतीतिखट, अती आंबट पदार्थ.
३) तामसिक : जास्त प्रमाणात चहा, कॉफी, लसूण, कांदा, मांसाहार तसेच मद्य, तंबाखू, गुटखा आदींचे व्यसन.
म्हणूनच ‘स्वयंपाकघर’ म्हणजे घरातील सर्वात स्वच्छ, पवित्र विचार प्रवाहित होतील असे मोकळे स्थान होय.
किचन म्हणजेच सर्व स्वभाव वैशिष्ट्य बनविण्याची किल्ली होय. येथे शाकाहार किंवा मांसाहार या अन्न घटकांचा निर्णय, अन्नघटक खरेदी करण्यासाठी येणारा पैसा, स्वयंपाक करणाºयाची मानसिक स्थिती आणि अन्नसेवन करणाºयाची मानसिक अवस्था हे चार भाव एकत्र मिळतात. हे चारही विचार आपला स्वभाव, संस्कार, कार्यकुशलता, ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, विवेक समृद्ध करण्यावर किंवा खुंटीत करण्यावर परिणाम करतात. म्हणून आधुनिकतेकडे जाताना अन्नासंबंधीचे नियम, अन्न बनविण्याच्या पद्धती, अन्नसेवन विधी योग्य आहे की नाही याबाबत विचार करणे गरजेचे आहे.
आहाराचा मनातल्या भावनांशी, विचार लहरींशी संबंध असल्याने मनावर अन्नाचा थेट परिणाम होतो. मनामध्ये ताण असल्यास स्वयंपाकाची चव लागत नाही. दवाखान्यात प्रिय व्यक्ति अॅडमिट असल्यास भूक लागत नाही. प्रिय व्यक्तिच्या आठवणीने स्वादिष्ट भोजनाची चव लागत नाही. याउलट चार प्रिय व्यक्ति एकत्रित आल्यास, प्रेमाने अन्न वाढल्यास ते चविष्ट लागते. सणासुदीला कुठलाही मसाला न घालता केलेला स्वयंपाक तृप्त करतो. असे कितीतरी उदाहरणे देता येतील.
आज सर्वच वैद्यकशास्त्र मानतात की, आजारांचे मुळ कारण मनबुद्धीमध्ये आहे. शरीरावर उपचार केल्याने कुठलाच आजार पूर्णपणे बरा होत नाही. आहार, विहाराची योग्य साथ आजारांचा समूळ नायनाट करते. यासाठी मनाची नियंत्रण शक्ती महत्वाची आहे.
आपल्या सर्वांच्याच जीवनाचे लक्ष्य सुंदर, सुखी व स्वस्थ जीवन आहे. आहाराद्वारे हे प्राप्त करण्यासाठी मनबुद्धी संस्कारक्षम बनविण्यासाठी आहारासोबत शुद्ध विचारांची जोड देणे आवश्यक आहे.