"भाज्यांचा ज्यूस पिणं लगेच करा बंद", डायटिशिअनने सांगितलं महत्वाचं कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:29 AM2024-05-29T10:29:33+5:302024-05-29T10:30:48+5:30
Vegetable Juice Healthy or Not :खरंच भाज्यांचा ज्यूस पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतो का? याबाबत डायटिशिअन डॉक्टर भावेश गुप्ता यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Vegetable Juice Healthy or Not : आजकाल लोक आपल्या आरोग्याबाबत फारच जागरूक झालेले दिसतात. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक सकाळी चालायला जाण्यापासून ते पौष्टिक आहार घेणं, फळाचं सेवन करणं अशा गोष्टींची खूप काळजी घेतात. बरेच लोक तर सकाळी वेगवेगळ्या भाज्यांच्या ज्यूसचंही सेवन करतात. भाज्यांच्या ज्यूसचे फायदे सांगणारे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण खरंच भाज्यांचे ज्यूस पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतो का? याबाबत डायटिशिअन डॉक्टर भावेश गुप्ता यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
बरेच लोक भाज्यांच्या ज्यूस हे समजून जास्त पितात की, त्यांना यातून जास्त व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतील. तसेच लोकांना वाटतं की, भाज्यांचा ज्यूस प्यायल्याने बॉडी डिटॉक्स होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. अशात ते भाज्या कमी खातात आणि ज्यूसच जास्त पितात. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. ते कसं हेच डॉक्टरांनी सांगितलं आहे.
डॉ. भावेश गुप्ता यांच्यानुसार, "तुम्ही जर भाज्यांचे ज्यूस पित असाल तर लगेच पिणं बंद करा. भाज्या या खत आणि मातीच्या माध्यमातून उगवल्या जातात. त्यामुळे त्यांमध्ये खूपसारे पॅटोजेनिक बॅक्टेरिया असतात. भाज्या केवळ धुवून यातील पॅटोजेनिक बॅक्टेरिया जाणार नाहीत. दुसरी बाब म्हणजे कच्च्या भाज्यांमध्ये अॅंटी न्यूट्रीअंट्स असतात ज्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते".
ते पुढे म्हणाले की, "आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग काय आता भाज्या खाणं बंद करावं? तर अजिबात नाही. तुम्ही भाज्या पाणी, तेल आणि थोडे मसाले वापरून शिजवून खाऊ शकता. भाज्या शिजवल्याने यातील पॅटोजेनिक बॅक्टेरिया नष्ट होता आणि अॅंटी न्यूट्रीअंट्सही नष्ट होतात. तसेच भाज्या शिजवून खाल्ल्याने तुमचं शरीर भाज्यांमधील न्यूट्रीअंट्सचं चांगलं अवशोषण करू शकते".
आता तुमच्या लक्षात आलं असेल की, भाज्यांचा ज्यूस पिणं तुमच्यासाठी नुकसानकारक का आहे. अशात तुम्ही जास्तीत जास्त भाज्या शिजवून खाण्यावर भर द्यावा. हाच नियम फळांसाठीही लागू पडतो. फळांचा ज्यूस केल्याने त्यातील पोषक तत्व कमी होतात आणि नुकसानकारक तत्व वाढतात.