सततच्या पोट फुगण्याने आहात हैराण? डायटीशिअनने सांगितले ५ घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 03:16 PM2024-05-29T15:16:42+5:302024-05-29T15:17:13+5:30
Home Remedies for Bloating : पोट फुगण्याची आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी एक्सपर्टनी सांगितल्या काही सोप्या टिप्स...
Home Remedies for Bloating : बऱ्याच लोकांना थोडं जरी काही खाल्लं तरी पोट फुगण्याची किंवा गॅसची समस्या होते. तसेच पोटात जडपणाही जाणवतो. अनेकांना या समस्या नेहमीच होतात. अशात ते वेगवेगळे औषधं घेतात किंवा उपचार करतात. पण या समस्या दूर करण्यासाठी तुमच्या घरातच काही सोपे आणि हेल्दी उपाय आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही या समस्या लगेच दूर करू शकता.
पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाहीये. न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशिअन Lovneet Batra यांनी एका इन्स्टा व्हिडीओच्या माध्यमातून ही समस्या दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत.
आले - आल्यामध्ये पचनक्रिया चांगली करण्याचे गुण असतात. आल्यामुळे गॅसची आणि पोट फुगण्याची समस्या दूर केली जाऊ शकते. त्यासाठी तुम्ही आल्याचं पाणी किंवा आल्याचा चहा घेऊ शकता.
पदीना - वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी पदीन्याचा वापर केला जातो. सोबतच याचा औषधी म्हणूनही वापर होतो. पचन चांगलं होण्यास आणि पोट फुगणं दूर करण्यास याचा फायदा होतो. पदीन्याचा काढा, चहा तुम्ही सेवन करू शकता.
दही - दह्यामध्ये असलेल्या प्रोबायोटिक्समुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. याने पोट फुगण्याची समस्याही दूर होते. दह्याने पोट थंड राहतं आणि पचन चांगलं होतं.
केळी - केळीमुळे शरीरात जास्त पाणी जमा होत नाही. तसेच याच्या सेवनाने ऊर्जा मिळते आणि पोटासंबंधी अनेक समस्याही दूर होतात.
बडीशेप - बडीशेपचा चहा प्यायल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मांसपेशींना आराम मिळतो. तसेच याने पोट थंड राहतं आणि पचनही चांगलं होतं.