तुम्हीही पॅकेटचं दूध पुन्हा पुन्हा गरम करता? एक्सपर्टने सांगितले होणारे गंभीर नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 10:15 AM2024-11-26T10:15:05+5:302024-11-26T10:15:32+5:30
पॅकेटचं दूध वापरत असताना बरेच लोक एक चूक करतात आणि ती म्हणजे पॅकेटचं दूध उकडून पिणे.
दूध एक संपूर्ण आहार म्हणून ओळखलं जातं. दुधाने शरीराला अनेक फायदे मिळतात. यात अनेक पोषक तत्व असतात ज्यांची शरीराला गरज असते. दुधात कॅल्शियम, प्रोटीन सोबतच व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, पोटॅशिअम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन A, मॅग्नेशिअम आणि रायबोफ्लेविन इत्यादी तत्व असतात. दुधामुळे हाडं मजबूत होतात आणि मसल्सची वाढही होते. तसेच दुधाने शरीराला एनर्जी मिळते.
गाव-खेड्यांमध्ये गायी-म्हशीचं ताजं दूध सहजपणे मिळतं. पण शहरांमध्ये जास्तीत जास्त पॅकेटच्या दुधाचा वापर केला जातो. मात्र, पॅकेटचं दूध वापरत असताना बरेच लोक एक चूक करतात आणि ती म्हणजे पॅकेटचं दूध उकडून पिणे.
डायटीशिअन भावेश गुप्ता यांनी सांगितलं की, पॅकेटचं दूध गरम करून सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. असं केल्याने दुधातील पोषक तत्व नष्ट होतात. अशात पॅकेटचं दूध गरम करून प्यायल्याने काय नुकसान होतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे.
पॅकेटचं दूध गरम करण्याची नाही गरज
डायटीशिअनने सांगितलं की, पॅकेटचं दूध आधीच पाश्चराइज्ड असतं. पाश्चरायजेशन प्रक्रियेत कच्च्या दुधाला ७२ डिग्री सेल्सिअसवर १५ ते ३० सेकंदापर्यंत गरम केलं जातं. ज्यामुळे त्यातील बॅक्टेरिया जसे की, सेलमोनेला आणि ई-कोली नष्ट होतात. या प्रक्रियेनंतर पॅकेटचं दूध सुरक्षित होतं आणि याला पुन्हा पुन्हा गरम करण्याची गरज नसते.
दुधात व्हिटॅमिन बी१२ असतं. हे एक असं पोषक तत्व आहे जे संपूर्ण शरीराला शक्ती देण्याचं काम करतं. हे जर कमी झालं तर हाडं कमजोर होतात. रक्त कमी होऊ शकतं, मसल्स कमजोर होतात. तसेच मेंदुही कमजोर होऊ शकतो. डायटीशिअन म्हणाले की, पॅकेटचं दूध गरम केल्याने हे पोषक तत्व नष्ट होतं.
दूध पुन्हा पुन्हा गरम का करू नये?
एक्सपर्ट सांगतात की, कच्च्या दुधात क्रिप्टो स्पोरिडिअम, कॅम्पिलोबॅक्टर, ब्रुसेला आणि लिस्टेरियासारखे नुकसानकारक बॅक्टेरिया असतात. पाश्चरायजेशनच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया नष्ट केले जातात, ज्यामुळे दूध सुरक्षित होतं. मात्र, दूध पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात.
पॅकेटचं दूध कधी गरम करावं?
डायटीशिअनने सांगितलं की, पॅकेटचं दूध तेव्हाच गरम करावं जेव्हा त्यापासून तुम्हाला दुसरे काही पदार्थ बनवायचे असतील. जसे की, पनीर. जर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर गरम करण्याची गरज नाही, थोडं कोमट नक्कीच करू शकता.