काय आहे स्क्रिझोफेनिया आजार, जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 03:19 PM2021-05-24T15:19:07+5:302021-05-24T15:24:12+5:30
स्क्रिझोफेनिया हा एक मानसिक आजार असून कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. या आजारामध्ये रुग्णाला अनेक भास होतात.
आज वर्ल्ड स्क्रिझोफेनिया डे. स्क्रिझोफेनिया हा एक मानसिक आजार असून कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. या आजारामध्ये रुग्णाला अनेक भास होतात. त्याला असं वाटतं की त्याच्या आजूबाजूला कोणीतरी आहे. त्यांना अशा गोष्टींचा भास होतो जी त्यांच्या आजूबाजूला नाहीयेत पण तरीही ती आहेत असा हट्ट ते धरतात. त्याच्या भावना तीव्र होतात. आपल्याविरोधात कोणीतरी कटकारस्थान करत आहे. आपल्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न होत आहे असे या रुग्णाला सतत वाटत राहते. दुर्दैवाने हा आजार आयुष्यभरासाठीचा असतो पण मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने तो आजार असतानाही माणूस आपले आयुष्य सर्वसाधारणपणे जगू शकतो.
स्क्रिझोफेनियाची लक्षणं
याची लक्षणं साधारणत: २० व्या वर्षी दिसू लागतात. झोप न लागणे, चित्रविचित्र भास होणे, मुड सतत बदलत राहणे, कोणतीही भावना तीव्र असणे, चिडचिड होणे, एकलकोंडेपणा, समाजात कोणाबरोबरही मिक्स न होणे, इतरांपासून लांब राहणे. स्वत:मध्ये दैवी शक्ती असल्याचा भास होणे आणि महत्वाचे म्हणजे आपले एक वेगळेच आभासी जग निर्माण करणे व त्यात राहणे.
स्क्रिझोफेनिया होण्याची कारणं
स्क्रेझोफेनिया हा अनुवांशिक असु शकतो, काहीवेळा तो सोशल डिसऑर्डरही असू शकतो. मेंदुतल्या विशिष्ट केमिकलमध्ये बदल झाल्यानेही स्क्रिझोफेनिया होऊ शकतो. जर एखाद्याच्या फॅमिली हिस्टरीमध्ये कोणाला स्क्रिझोफेनिया असेल तर त्याला स्क्रिझोफेनिया होण्याची शक्यता जास्त असते. ड्रग्जच्या सेवनामुळेही स्क्रिझोफेनिया होऊ शकतो. स्क्रिझोफेनिया झालेल्या रुग्णाचा मेंदु अभ्यासला तर त्यात विविध पद्धतीचे विचित्र बदल आढळून येतात.
स्क्रिझोफेनियाचे परीणाम
स्क्रिझोफेनिया झाल्यामुळे तो रुग्ण कोणतेही काम लक्षपुर्वक करू शकत नाही. अशा रुग्णांना शालेय वयात अभ्यास करतानाही अडथळे येतात. त्यांच्या एकंदर आकलनशक्तीवर परिणाम झालेला असतो. ते कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. ते समाजापासून स्वत:ला वेगळे करतात. रोजची सर्वसाधारण कामे करणे त्यांना जमत नाही.
स्क्रिझोफेनियावरचे उपाय
स्क्रिझोफेनियाच्या लक्षणांची यादीच मानसोपचारतज्ज्ञांकडे असते. यावर समुपदेशन व त्यासह औषध देऊन याचा प्रभाव कमी करता येतो. रुग्ण आपले सर्वसाधारण आयुष्य जगू शकतो. मानसिक उपचारांनीच स्क्रिझोफेनियावर मात करता येते.