दृष्टीला जे दिसते ते वेगळे, मेंदूला जे वाटते ते वेगळे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 08:27 AM2022-01-10T08:27:32+5:302022-01-10T08:27:49+5:30

आजकाल तुमच्या डोळ्यासमोर अंधारी येते? डोके दुखते? फोन पाहिल्यावर चक्कर येते किंवा मळमळ वाटते? - तर मग तुम्ही एका नव्या आजाराचे बळी आहात!

Different from what the eyes see, different from what the brain feels? | दृष्टीला जे दिसते ते वेगळे, मेंदूला जे वाटते ते वेगळे?

दृष्टीला जे दिसते ते वेगळे, मेंदूला जे वाटते ते वेगळे?

Next

- डॉ. दीपक शिकारपूर

सध्याच्या न्यू नॉर्मल जगामध्ये व्हर्च्युअल जीवन पद्धती आपल्या अंगवळणी पडली आहे. कोविड-१९ साथीचा परिणाम म्हणून घरबसल्या कामाची पद्धत वाढली आहे. ही व्हर्च्युअल सुविधा सुखासीन असली तरी, आठवड्यातून ४० तासांपेक्षा जास्त तास स्क्रीनकडे टक लावून पाहणे अत्यंत  कठीण आहे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम आता समोर येत आहेत. 

सतत ऑनलाइन व कुठल्यातरी स्क्रीनसमोर असणे हे जर अति झाले, तर त्याचे दुखण्यात रूपांतर होऊ शकते. तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनचा प्रकाश सतत बघून अंधारी येते? डोके दुखते? फोन पाहिल्यानंतर चक्कर येते किंवा मळमळ वाटते?- जरा विचार करून पाहा.  स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्यामुळे जाणवणाऱ्या या संवेदना फक्त डोळ्यांचा ताण किंवा थकवा आहेत, असे तुम्हाला वाटत असले तरी, ती खरेतर सायबरसिकनेस नावाच्या स्थितीची लक्षणे आहेत. ही लक्षणे तीन प्रकारांत आढळतात मळमळ, चक्कर येणे  आणि डोळ्यांचा ताण, थकवा आणि डोकेदुखी यासारखी ऑक्युलोमोटर लक्षणे! यामध्ये डोळ्यांची हालचाल नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूवर जास्त ताण येतो. काही वेळा लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि अंधूक दृष्टी, या समस्या तासन‌्तास टिकू शकतात आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. आपले डोळे आणि कानात एक समतोल साधणारी प्रणाली असते. त्यावरही या अति स्क्रीनचा परिणाम होतो.

सायबरसिकनेसमुळे, तुमच्या डोळ्यांना वाटते की, तुम्ही हलत आहात; परंतु तुम्ही स्थिर असता, हा एक संवेदी संघर्ष आहे. संगणक, फोन आणि टीव्हीयासारख्या उपकरणांद्वारे सायबरसिकनेसची लक्षणे अनुभवू शकता. ॲपलने काही वर्षांपूर्वी आयफोन लॉक स्क्रीनवर पॅरॅलॅक्स इफेक्ट जारी केला. ज्यामुळे वापरकर्त्याने त्यांचा फोन फिरवला की, पार्श्वभूमी प्रतिमा तरंगल्या किंवा हलवल्यासारखे वाटत  असे. यामुळे अनेकांना अत्यंत अस्वस्थ वाटले. वेबसाइटस्वर पॅरॅलॅक्स स्क्रोलिंग, जिथे पार्श्वभूमी प्रतिमा स्थिर राहते आणि स्क्रोल करताना अग्रभागातील माहिती हलते, ही हालचाल काही लोकांना अस्वस्थ करू शकते. सतत गॉगल घालून व्हर्च्युअल रिॲलिटीवर आधारित खेळसुद्धा तितकेच धोकादायक आहेत. 

- आपल्या दृष्टीला जे दिसते आणि मेंदूला जे वाटते यात जर तफावत झाली, तर अशी गल्लत होऊ शकते. व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये तुमचे वास्तविक जग व अनुभवणारे दृश्य यात तफावत असते. यामुळे मळमळाची तीव्र पातळी होऊ शकते. ऑगमेंटेड रिॲलिटी तंत्र पण अनेकांना अति वापरामुळे त्रासदायक ठरू शकते. या सायबर आजारामुळे तुमच्या समन्वयावर आणि लक्ष केंद्रित करायच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हे दुष्परिणाम कायम राहिल्यास, तुम्ही वाहन चालवत असताना त्यामुळे अपघात होऊ शकतो. यावर सर्वांत सोपा उपाय म्हणजे स्क्रीन वापर कमी करण्याचा प्रयत्न करणे.

एकाच वेळी अनेक स्क्रीन वापरणे टाळणे. शक्य असेल तेव्हा पाहण्याऐवजी ऐकणे. इलेक्ट्रॉनिक वाचनाऐवजी ऑडिओ किंवा मुद्रित मजकूर वाचणे, की-बोर्डवर मजकूर टाइप करण्याऐवजी हाताने लिहिणे, स्क्रीनवरील पॉप-अप बंद करणे आणि चमकदार डिस्प्ले टाळणे, खोली हवेशीर आणि तीव्र गंधमुक्त ठेवणे. यावरील औषधे वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत. एकंदर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा दुष्परिणांना आमंत्रण देतो. त्यामुळे नियंत्रित काळजीपूर्वक तंत्रवापर हेच सत्य आहे. 

Web Title: Different from what the eyes see, different from what the brain feels?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.