मुलं वारंवार आजारी पडतायत? 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 07:37 PM2018-12-20T19:37:21+5:302018-12-20T19:37:53+5:30
थंडीमध्ये जर तुमचं मुल सतत आजारी पडत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे शरीराच्या अनेक समस्या उद्बवण्याचा धोका असतो.
थंडीमध्ये जर तुमचं मुल सतत आजारी पडत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे शरीराच्या अनेक समस्या उद्बवण्याचा धोका असतो. त्यामुळे मुलाला सतत सर्दी, खोकला, ताप इत्यादी समस्या उद्भवण्याचा धोका असतो. जर अशावेळी तुम्ही मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र अनेक गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. जाणून घेऊया काही अशा पदार्थांबाबत जे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात.
डेअरी प्रोडक्ट :
मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डेअरी प्रोडक्ट्स उपयोगी ठरतात. थंडीमध्ये दूध आरोग्यदायी ठरतं. दररोज दूधासोबतच दूधाच्या पदार्थांचाही आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. दूधासोबतच दही, पनीर इत्यादी पदार्थ शरीरासाठी लाभदायक ठरतात.
हळद :
हळद शरीरासाठी इम्यूनोमॉड्यूलेटरी क्षमतेला वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. हळदीमध्ये असणारं कर्क्यूमिन घटक एखाद्या अॅन्टीऑक्सिडंटप्रमाणे काम करतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दूधामध्ये हळद टाकून घेणं फायदेशीर ठरतं.
मशरूम :
व्हिटॅमिन डी आणि अॅन्टीऑक्सिडंटयुक्त मशरूम रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. फक्त मशरूम खाण्यासाठी मुलं टाळाटाळ करत असतील तर तुम्ही मशरूमची भाजी किंवा सॅन्डविच तयार करून त्यांना देऊ शकता. मशरूम सूपही बेस्ट ऑप्शन आहे.
ड्राय फ्रुट्स :
अनेकदा मुलं फळं आणि भाज्या खाण्यास नकार देतात. अशातच तुम्ही त्यांना काजू, बदाम आणि अक्रोड यांसारखे नट्स देऊ शकतात. अक्रोड, बदाम, खजूर आणि मनुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स आणि अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.
व्हिटॅमिन सी :
व्हिटॅमिन सी बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी मदत करतात. जांभूळ चेरी आणि पेरूमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सी म्हणजेच अस्कॉर्बिक अॅसिडदेखील म्हणतात.