​ओळखा दिवाळीच्या मिठाईतील भेसळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2016 02:40 PM2016-10-19T14:40:48+5:302016-10-19T14:41:34+5:30

सण-उत्सव म्हटला की, आनंदाची मेजवानीच असते.....

Dishwarya dessert adulteration! | ​ओळखा दिवाळीच्या मिठाईतील भेसळ !

​ओळखा दिवाळीच्या मिठाईतील भेसळ !

googlenewsNext
सण-उत्सव म्हटला की, आनंदाची मेजवानीच असते. त्यात नवनवीन कपडे, घरातील विविध वस्तू तसेच तोंड गोड करण्यासाठी असते ती मिठाई. मात्र कदाचित आपण खात असलेली मिठाई हे गोड विष ठरू शकते. हो हे खरे आहे, कारण आपण आणलेल्या लाडू, बर्फी, खवा यात भेसळ असू शकते. कारण या काळात विक्री व नफा वाढविण्यासाठी काही उत्पादक मिठाईत भेसळ करीत असतात. आजच्या सदरात आपण भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात, तसेच भेसळयुक्त मिठाई घरच्याघरी कशी तपासावी याबाबत जाणून घेऊयात...


शरीरावर होणारे दुष्परिणाम
भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने आतड्यांना नुकसान होऊन त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. तसेच फूड पॉयझनिंग तर होतेच शिवाय त्या व्यतिरिक्त किडनी आणि लिव्हर खराब होण्याची दाट शक्यता असते. कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. मिठाईत वापरले जाणारे आरारोट सारख्या पावडरमुळे मुलांची हाडे कमकुवत होतात तसेच जास्त साखर असलेली मिठाई सतत खाल्ल्याने मुलांना डायबिटीजदेखील होऊ शकतो.

मिठाईतील भेसळ कशी ओळखाल
मिठाई रंग :
मिठाईला आकर्षक व फ्रेश कलर देण्यासाठी मेटॅनिल यलो हा कृत्रिम रंग वापरला जातो. हे ओळखण्यासाठी मिठाईच्या तुकड्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे काही थेंब टाका. मिठाईला जांभळा रंग आल्यास त्यात कृत्रिम रंगाचा वापर केला असल्याचे समजते. तसेच मिठाई हातात घेतल्यानंतर हाताला जर रंग लागत असेल तर समजावे की, मिठाई भेसळयुक्त आहे. मेटॅनिल यलो आणि टारट्राजाइन असे पदार्थ वापरण्यास बंदी आहे. 

खवा:
खव्यामध्येदेखील स्टार्च मिसळले जाते. ते ओळखण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये थोडासा खवा घ्या व त्यात पाणी मिसळा. ते थोडे गरम करा. खवा गार झाल्यावर त्यात पाच थेंब आयोडिन टाका. जर खव्याचा रंग जांभळा झाला तर त्यात स्टार्च मिसळले आहे.  
  
दूध:
दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यात खडू पावडर, साबण पावडर, हायड्रोजन पेरॉक्साइड, यूरिया व पाणी मोठ्या प्रमाणात मिसळले जाते. हे ओळखण्यासाठी समान आणि स्वच्छ भागावर दुधाचे थेंब टाका. भेसळयुक्त दूध सगळीकडे पसरते तर शुद्ध दूध सरळ रेषेत वाहते. तसेच दूध घेतल्याच्या काही काळानंतर पिवळे पडले तर भेसळ समजावी आणि पांढरेच राहिले तर शुद्ध आहे असे समजावे. दुधाचे काही थेंब बोटावर घेऊन घासल्यास फेस आला तर भेसळ समजा. तसेच दुधाचे नमुने परीक्षानळीत घ्या व त्यात सोयाबिनची पावडर घाला, नळी हलवून त्यात रेड लिटमस पेपर टाका. दुधात युरिया असेल तर पेपर निळा होतो. दूध पावडरमध्येही कोल्टारडीजची भेसळ केली जाते. ते ओळखण्यासाठी सल्फ्युरिक अ‍ॅसिड टाकावे. जर पदार्थाचा रंग गुलाबी झाला, तर भेसळ असल्याचे ओळखावे. 

खाद्य तेल:
खाद्य तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी यात खनिज तेल मिश्रीत केले जाते. ते ओळखण्यासाठी परीक्षा नळीत तेलाचा नमुना घ्या व त्यात पोटॅशिअम हायड्रॉक्साइड मिसळा. मिश्रण विरघळले तर तेल शुद्ध समजा. मिश्रणाचे दोन थर तयार झाले तर भेसळ ओळखा.

 तूप:
तूपातही कोल्टारडीजची भेसळ केली जाते. ते ओळखण्यासाठी सल्फ्युरिक अ‍ॅसिड टाकावे. जर पदार्थाचा रंग गुलाबी झाला, तर भेसळ असल्याचे ओळखावे. 

रबडी:
यात टिपकागदाची मोठी भेसळ केली जाते. ते ओळखण्यासाठी रबडीच्या नमुन्यात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे काही थेंब टाका, त्यात थोडे पाणी मिसळा व काच नळीने मिश्रण ढवळा. नळीवर तंतू जमा झाले तर कागदाची भेसळ समजा. 

चांदीचा वर्ख:
बऱ्याचदा मिठाईवर चांदीच्या वर्खाच्या नावाने अ‍ॅल्युमिनियम फ्वॉइल वापरले जाते. ते ओळखण्यासाठी चांदीचा अर्क जाळा. खरा चांदीचा अर्क जाळल्यास तो लहानशा बॉल प्रमाणे दिसेल तर अ‍ॅल्युमिनियम फ्वॉइल घट्ट स्लेटी (करडा) रंगाचे होईल. खोटा चांदीचा अर्क रंग सोडतो. दुसऱ्यापद्धतीने ओळखाचे झाल्यास वर्खाचा नमुना कोमट पाण्यात टाका. त्यात डायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे थेंब टाका. मिश्रणात हायड्रोजनचे बुडबुडे आले तर भेसळ असल्याचे ओळखा. 

पिठीसाखर / साखर 
यात खाण्याचा व धुण्याचा सोडा मिश्रित केला असतो. हे ओळखण्यासाठी पिठीसाखरेच्या नमुन्यात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे थेंब टाका. फेस आल्यास भेसळ आहे असे समजावे. साखरेतही खडूच्या भुकटीची भेसळ असते. पेलाभर पाण्यात एक चमचा साखर टाका. साखर थेट तळाला गेली तर शुध्द समजा. काही कण पाण्यात तरंगत राहिले तर भेसळ समजा.
ravindra.more@lokmat.com

Web Title: Dishwarya dessert adulteration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.