डॉक्टरला न विचारता पेन किलर घेताय?-सावधान
By admin | Published: May 22, 2017 05:40 PM2017-05-22T17:40:18+5:302017-05-22T17:40:18+5:30
स्वत:च्याच मनानं स्वत:वर उपचार करणं का घातक आहे? -हे वाचा..
- निशांत महाजन
डोकं दुखलं का घ्या औषध, सर्दी झालीये जा मेडिकलमध्ये घ्या औषध, असं करत छोट्यामोठ्या आजारात काहीजण स्वत:वरच औषधोपचार करत सुटतात. मेडिकलमध्ये जातात आणि पाठदुखी, डोकेदुखी, सर्दी-खोकला, तोंड येणं ते अंगदुखी ते अॅसिडीटी यासाऱ्यावर सर्रास स्वत:च्या मनानं वाट्टेल ती औषधं घेतात. किंवा मेडिकल स्टोअरम्ये जावून मेडिकलवाला जे देईल ते घेतात. किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेली जुनीच औषधं पुन्हा घेतात कारण डॉक्टरकडे जायचा कंटाळा. मात्र हे असं सेल्फ मेडिकेशन केल्यानं अनेकांच्या मागे अॅसिडीटी नावाचा मोठा आजार लागतो आहे. गेल्या वर्षभरात साधारण ११ टक्क्यांनी अॅण्टासिड गोळ्यांचा सेल वाढला आहे. आधी स्वत:च्या मनानं औषधं घेणं आणि मग अॅसिडीटी झाली म्हणून पुन्हा स्वत:च्या मनानंच अॅण्टासिड अर्थात अॅसिडीटी कमी करणाऱ्या गोळ्या घेणं असं एक दृष्टचक्र अनेकांच्या आयुष्यात सुरु झालं आहे.
अॅसिडीटी होण्याचा आजार तसा कॉमन असला तरी तो लाइफस्टाईल डिसीज आहे. म्हणजे आपल्या चूकीच्या जीवनपद्धतीतून तो बळावतो. जीवनशैली आणि आहारविहारात नियमितता आणली तर अॅसिडीटी आटोक्यात राहू शकते. मात्र ते न करता सतत अॅण्टासिड घेत राहण्याची अत्यंत घातक सवय अनेकांना लागली आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यात अलिकडेच करण्यात आलेल्या एका क्लिनिकल सर्व्हेक्षणानुसार २७% रुग्ण हे स्वत:च्या आजाराचं स्वत:च निदान करतात. त्यासाठी पेनकिलर किंवा अन्य औषध स्वत:च्या मनानं डॉक्टरकडे न जाताच घेतात. आणि मग तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत त्या आजारापलिकडे एक दुसरा गंभीर आजार त्यांना बळावतो. तो म्हणजे वारंवार तीव्र पित्त होणं. अॅसिडीटी होतेय त्यावरही इतर इलाज न करता हे लोक पुन्हा मेडिकलमध्ये ओव्हर द काऊण्टर मिळणाऱ्या, जाहिरातीत दिसणाऱ्या अॅण्टासिड गोळ्या घेऊ लागतात. त्यानं ती बरी होत नाही. तात्पुरता आराम काहीजणांना मिळतो. आणि वारंवार अॅण्टासिड घेण्याची सवय लागते.
अशी औषधं घेण्यात २० ते ३० वयोगटातील मुलांचं प्रमाण जास्त असल्याचंही डॉक्टरांचं निरीक्षण आहे.
त्यामुळे स्वत:चं डोकं न चालवता, गुगल करुन आजाराचं निदान न करता डॉक्टरकडे जावं आणि औषधं घ्यावीत. तसं न केल्यास, मनानं औषधं घेत राहिल्यास अन्य आजारासह वारंवार पित्त होण्याचा आजार होतो. बळावतो. आणि बरा होणं अवघड असतं.