जिममध्ये जायला वेळ नाही, मग घरीच करा हा व्यायाम..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 05:55 PM2017-12-22T17:55:06+5:302017-12-22T17:56:15+5:30
घरच्या घरी व्यायाम कसा आणि कोणता करावा?
- मयूर पठाडे
अनेकांची त्यातही बºयाचदा स्त्रियांची, तरुणींची तक्रार असते, रोजच्या कामाच्या धबडग्यात आम्हाला व्यायामाला वेळच मिळत नाही. खरंतर त्यांची व्यायामाची इच्छा असते, पण त्यासाठी जिममध्ये किंवा ग्राऊंडवर जाण्यासाठी त्यांना वेळच होत नाही.
काहींसाठी हे ‘कारण’ असतं तर काहींना खरंच त्यासाठी वेळ होत नाही किंवा त्यांच्या सोयीच्या वेळेत जिममध्ये किंवा ग्राऊंडवर जाणं शक्य नसतं.
अशा महिला आणि पुरुषांसाठी घरातल्या घरातही काही व्यायाम करणं सहज शक्य आहे. त्यामुळे आपल्या एकूणच एनर्जी लेवलमध्ये वाढ होऊ शकते आणि आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
ज्यांना व्यायामासाठी बाहेर जायला वेळ नाही, त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर असा घरातल्या घरात करायचा व्यायाम काय आहे?
ज्यांनी पूर्वी कधी व्यायाम केलेला नाही किंवा व्यायामाची ज्यांना सवय नाही, ज्यांची जीवनशैली बैठी आहे, अशा साºयांनी आपल्या व्यायामाची सुरुवात स्ट्रेचिंग एक्सरसाइजेसपासून करायला हवी. हे ताणाचे व्यायाम करायला फार वेळही लागत नाही, घाम गाळावा लागत नाही आणि ते फार अवघडही नाही. प्रत्येकानं आपापल्या शरीराच्या लवचिकतेनुसार सुरुवात करावी. यामुळे आपल्या शरीराची लवचिकता तर पूर्वीपेक्षा वाढेलच, पण आपण आपल्या कामासाठी जे स्रायू जास्त वापरतो, त्यातलं ब्लड सर्क्युलेशनही वाढेल आणि त्यामुळे एकूणच आपली कार्यक्षमताही त्यामुळे वृद्घिंगत होईल.
स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस झाल्यानंतर दहा मिनिटे कार्डिओ एक्सरसाइजेस करा. त्यासाठी तुम्ही जिन्यांची चढउतर करू शकता, जागच्या जागी जॉगिंग करू शकता किंवा घरातल्या घरात दोरीवरच्या उड्या मारू शकता. यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होईल आणि तुमच्या शरीरातील कॅलरीजही त्यामुळे बर्न होतील.
याशिवाय मुख्य म्हणजे तुमची चयापचय क्रिया सुधारेल आणि एकदा थोड्या वेळ केलेल्या या व्यायामानं चयापचय क्रियेवर त्याचा तब्बल २४ तास विधायक परिणाम दिसून येईल.
यानंतर हळूहळू आपल्या व्यायामाची तीव्रता वाढवता येईल.
घरच्या घरी करण्याचे आणखी काही व्यायाम पाहू या पुढच्या भागात..