हळदीचं सेवन करताना करू नका 'ही' चूक, किडनी डॅमेजचा वाढू शकतो धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 12:30 PM2024-05-01T12:30:21+5:302024-05-01T12:39:41+5:30
Health Tips : जर किडनी हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही हळदीचं वेगवेगळ्या माध्यमातून जास्त सेवन करत असाल तर तुम्ही चुकताय.
Health Tips : भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. इतकंच नाही तर फार पूर्वीपासून आयुर्वेदिक चिकित्सेत हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं एक तत्व असतं ज्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. अनेक आजारांवर रामबाण औषध मानली जाणारी हळद किडनीच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. हळदीने एक नाही तर अनेक फायदे होतात. पण याचे काही नुकसानही होतात. अशात जर किडनी हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही हळदीचं वेगवेगळ्या माध्यमातून जास्त सेवन करत असाल तर तुम्ही चुकताय.
हळद आणि किडनी
हळदीमध्ये असलेल्या करक्यूमिनमध्ये शक्तीशाली अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स गुण असतात. हे गुण किडनीचा क्रोनिक सूजेपासून बचाव करतात. किडनी डिजीजच्या अनेक कारणांमध्ये सूज एक महत्वाची भूमिका बजावतो. तेच हळदीतील करक्यूमिन सूज कमी करण्यास मदत करतं.
किडनी रोगही ऑक्सीडेटिव तणावासंबंधी असतो, जो कोशिकांचं नुकसान करतो. हळदीमधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स हा तणाव कमी करण्यास मदत करतात. डायबिटीसमुळेही किडनी डिजीजचा धोका असतो. हळद ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करते. ज्यामुळे कोशिकांचा या नुकसानापासून बचाव होतो.
किडनी स्टोन
अनेक रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, हळदीचं नियमित सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. हळदीमध्ये अॅंटी-मायक्रोबिअल गुण असतात जे किडनी इन्फेक्शनपासून बचाव करतात. किडनीचं आरोग्य वेगवेगळ्या कारणांनी बिघडतं. अशात हळद अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते.
काय करू नये चूक?
किडनीच्या आरोग्यासाठी हळद किती महत्वाची आहे हे तर तुम्हाला समजलं असेल. पण त्यासोबत हेही माहीत असलं पाहिजे की, हळदीचे कोणत्या स्थितीत नुकसानही होतात. कशाचाही विचार न करता हळदीचं जास्त सेवन केलं तर हे किडनीसाठी घातक ठरू शकतं. काही रिसर्चनुसार, करक्यूमिनच्या जास्त सेवनाने नेफ्रोटॉक्सिक प्रभाव होऊ शकतो. या स्थितीमध्ये किडनी डॅमेड होण्याचा धोका वाढतो. जर तुम्हाला आधीच किडनीसंबंधी काही समस्या असेल तर ही समस्या जास्त गंभीर होऊ शकते.
अनेकदा किडनी निरोगी ठेवण्यासाठीची औषधं आणि रक्त पातळ करण्याची औषधं यांची क्रिया होऊन समस्या वाढू शकते. हळदीमध्ये ऑक्सालेट कंपाउंड असतात. सेंसिटिव लोकांमध्ये कॅल्शिअम ऑक्सालेट किडनी स्टोनचं कारण ठरू शकतं. त्यामुळे जर तुम्ही हळदीचं स्वत:च्या मनाने वेगवेगळ्या पद्धतीने जास्त सेवन करत असाल तर हे घातक ठरू शकतं. त्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.