केवळ सोशल मीडियावर फोटो टाकायला मॅरेथॉनमध्ये धावू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 09:49 AM2023-08-14T09:49:51+5:302023-08-14T09:50:44+5:30
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात विविध संस्था मॅरेथॉनचे आयोजन करत आहेत.
डॉ. अजय चौरासिया, हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय.
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात विविध संस्था मॅरेथॉनचे आयोजन करत आहेत. विशेष म्हणजे, त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. निरोगी आरोग्यासाठी चालणे, धावणे फायदेशीर आहे. मात्र, अनेक उत्साही तरुण-तरुणी केवळ मॅरेथॉन जाहीर झाली आहे, इतर सहभागी होत आहेत म्हणून सहभागी होतात. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. फिजिओथेरपिस्ट, जनरल फिजिशियन यांचा सल्ला घ्या. स्वत:ची वैद्यकीय चाचणी करून घ्या. स्वत:ला कुठलाही आजार नाही ना, याची खात्री करून घ्या. हृदयाची तपासणी करून घ्या.
मॅरेथॉनमध्ये धावायचे असेल तर त्यासाठी नियमितपणे शास्त्रशुद्ध सराव आणि प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. सुरुवात सर्वात छोट्या ‘र’ने करा. मग टप्प्याटप्याने पुढे जा. यासाठी नियमितपणे रोज सकाळी धावण्याचा सराव केला पाहिजे. केवळ मॅरेथॉन आली आहे, म्हणून प्रॅक्टिस नको. यामध्ये वर्षभर सातत्य असले पाहिजे. जर कोणत्याही व्यक्तीला काही वैद्यकीय समस्या असतील तर त्याला नजरेआड करून धावण्याचा अट्टहास करू नये. आपण धावण्यासाठी योग्य आहोत का? हे तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रमाणित करून घ्या. कुणाला तरी दाखवायचे आहे, सोशल मीडियावर फोटो टाकायचे आहे म्हणून मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊ नका. आरोग्य जोपासण्यासाठी आपण धावत आहोत, हे कायम लक्षात ठेवा.
गेल्या काही वर्षांत मॅरेथॉनसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत आहे. खूप जणांची धावायची इच्छा असते. अनेकांची वैद्यकीय कारणांनी ती पूर्ण होत नाही. मात्र, आता वॉकेथॉन नावाचा प्रकार सुरू झाला आहे. अनेक सामाजिक संस्था समाजात जनजागृती घडविण्यासाठी याचे आयोजन करत असतात. ज्यांना मॅरेथॉनमध्ये भाग घेणे शक्य नाही त्यांनी तिकडे जावे.
या आहेत काही टिप्स
- धावण्याच्या सरावास सुरुवात करताना प्रथम चाला, वेग वाढवा, मग धावा. सगळ्या गोष्टी हळूहळू करा.
- शरीराच्या विरोधात जाऊन कोणतीही गोष्ट करू नका, ज्या क्षणी काही दुखत असेल तर थांबा.
- मॅरेथॉनपूर्वी किमान सहा महिन्यांपासून सराव सुरू करावा, त्यानंतर कायम सातत्य ठेवावे.
- शारीरिक क्षमता तज्ज्ञांकडून तपासून घ्यावी.
- ध्येय निश्चित करून सराव करावा.
- संतुलित आहारासोबत स्नायू बळकटीकरणासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्याने प्रोटीन, प्रथिने घ्या.
- शरीराच्या ठेवणीकडे लक्ष द्या, प्रशिक्षकाकडून योग्य फिटनेसचे धडे घ्या.
- जाहिरातीतील शूज चांगले असतीलच असे नाही, चौकशी करून चांगले शूज घ्या.
- पुरेशी झोप महत्त्वाची आहे.