बंद नाकासाठी तुम्हीही ‘हे’ औषध घेताय का? थांबा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 10:11 AM2023-10-22T10:11:15+5:302023-10-22T10:11:34+5:30
धोका नसला, तरी सावधगिरीचा इशारा
लंडन: सर्दी, तापासाठी तसेच बंद नाक उघडण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण नजीकच्या मेडिकलमधून गोळ्या, सिरप घेतो. परंतु, या औषधांमध्ये असलेले फिनाइलफ्राइन घटक उपयोगाचे नसल्याचे अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सल्लागार पॅनलने म्हटले आहे.
हे औषधी प्रभावहीन असले, तरी त्याच्या सुरक्षिततेबाबत कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. परंतु, स्प्रेच्या माध्यमातून घेतलेले औषध अधिक प्रभावी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत औषध विक्री थांबवली
फिनाइलफ्राइनच्या प्रभाव क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर अमेरिकेतील सीव्हीसी फार्मसीने या औषधांची विक्री थांबवली.
आरोग्याला धोका नाही, पण...
गोळ्यांच्या स्वरुपातील औषधापासून धोका नाही, केवळ चोंदलेल्या नाकावर ते प्रभावहीन असल्याचे औषध प्रशासनाने म्हटले आहे.
काय आहे फिनाइलफ्राइन?
१९७० च्या दशकात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये फिनाइलफ्राइनची विक्री सुरू झाली. सर्दी झाल्यावर चोंदलेले नाक मोकळे होण्यासाठी आणि श्वासोच्छ्वास सहज घेता यावा, यासाठी फिनाइलफ्राइनचा वापर केला जातो. सध्या अनेक देशांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्दी, तापाच्या औषधांमध्ये फिनाइलफ्राइन हे घटक असते. २००८ मध्ये स्पर्धक औषध असलेल्या स्यूडोएफेड्रिनवर बंदी आल्यावर फिनाइलफ्राइनचा वापर वाढला.
पाहणीत काय निष्पन्न झाले?
कोणतेही औषध घेतल्यावर ते प्रथम पोटात जाते. त्या औषधाचा संबंधित विकारावर प्रभाव झाल्यावरही त्याचा अगदी काही भाग पोटातच राहतो. नव्या संशोधनानुसार सर्दी, तापाचे औषध पोटातून घेतल्यावर त्यातील फिनाइलफ्राइनची प्रभावी क्षमता १ टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात होती. त्यामुळे बंद नाक उघडण्यासाठी ते फारसे उपयोगी नसल्याचे सिद्ध झाले. दुसरीकडे मात्र नेझल स्प्रेच्या माध्यमातून घेतलेले औषध मात्र अधिक परिणामकारक असते.