कधी द्याल लक्ष स्वत:कडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 05:30 PM2017-09-23T17:30:35+5:302017-09-23T17:32:30+5:30
इतरांसाठी खूप काही केलं, करतोय.. थोडा वेळ स्वत:लाही द्या
- मयूर पठाडे
सगळ्या जगाची आपल्याला काळजी.. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. कुठेही कोणतीही कमतरता नको.. मग ते आॅफिस असो, घर असो, नातेवाईकांचं असो, इतर जबाबदाºया असो किंवा स्वत:ची काही कर्तव्य.. सगळ्यांसाठी सगळं, अगदी मान मोडून आपण करत असतो.. पण आपल्यासाठी काय? आपल्याकडे, स्वत:कडे आपण किती लक्ष देतो? जिवाला थोडी तरी स्वस्थता आहे की नाही?..
ही स्वस्थता आपल्याला कोणीच स्वत:हून देणार नाही. ती आपली आपणच मिळवायला हवी. ही धावाधाव जर थांबवली नाही आणि स्वत:कडे लक्ष दिलं नाही, तर आपलं आयुष्य हळूहळू आणि कदाचित अगदी अचानक, चालता-बोलता संपूनही जाईल..
फुकाचे बोल किंवा फुकटचा सल्ला नाही हा, शास्त्रज्ञांनी त्याबाबत अधिकचं संशोधन करताना सगळ्यांनाच स्वत:कडे पाहाण्याची विनंती केली आहे. अगदी कळकळीनं..
त्यासाठी काय करायला हवं, याचं मार्गदर्शनही त्यांनी केलं आहे.
थोडं स्वस्थचित्त होण्यासाठी काय कराल?
१- तुम्ही कधी बघितलंय स्वत:च्या श्वासाकडे? नसेल तर नक्की बघा. थोडा वेळ शांतपणे आपल्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. एक प्रकारचा निवांतपणा तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमचे ताणतणावही दूर होतील.
२- भूतकाळात किंवा भविष्यकाळाच्या चिंतांनी स्वत:ला पोखरत बसण्यापेक्षा वर्तमानात जगायला जगा. थोडं स्लो डाऊन करा.
३- ध्यानधारणेचाही चांगला उपयोग होतो. त्यासाठी अगदी ध्यानाच्या किंवा योगाच्या वर्गालाच जायला पाहिजे असं नाही. घरच्याघरीही अगदी रोज पाच-दहा मिनिटं जरी शांतपणे बसलात, तरी समजा, तो एक प्रकारचा योगाच आहे.
४- आभासी जगातूनही थोडं बाहेर आलं पाहिजे. सोशल मिडियावर रमण्यापेक्षा मित्रमंडळींमध्ये प्रत्यक्ष जा. फोनवर बोलण्यापेक्षा त्यांची कधीतरी भेट घ्या. त्यातून मिळणारा आनंद नेहमीच जास्त असेल.