विस्मरण होतंय? काहीच लक्षात राहात नाही? -आहारात ओमेगा थ्री अँसिडचा समावेश करा..
By admin | Published: May 23, 2017 02:49 PM2017-05-23T14:49:23+5:302017-05-23T14:49:23+5:30
अल्झायमरसारख्या मेंदूच्या विकारापासून वाचायचं असेल तर या गोष्टी करायलाच हव्यात..
Next
- मयूर पठाडे
आपला आहार हेच अतिशय उत्तम असं रोगप्रतिबंधक औषध आहे आणि भविष्यात होऊ शकणार्या आजारांना आजच प्रतिबंध करायचा असेल तर आपल्या आहार-विहाराकडे लक्ष दिलं पाहिजे हे शेकडो वर्षांपूर्वी आपल्या आयुर्वेदानं सांगितलेलं सत्य आजच्या विज्ञानाच्या कसोटीवर पुन्हा तावूनसुलाखून निघत आहे.
आजकाल अनेक जण अल्झायमरच्या आजारानं त्रस्त झालेले आपल्याला दिसतात. मेंदूच्या संदर्भात हा आजार आहे. विस्मरण होणे, स्मृती नष्ट होणे, पटकन विसरून जाणे. यासारख्या गोष्टी या आजारामुळे होतात.
पण का होतो हा आजार?
आपल्या आहारातून पुरेसे अन्नघटक आपल्याला मिळाले नाहीत, तर विविध प्रकारचे आजार आपल्याला होतात. अल्झायमरच्या बाबतीतही अनेक कारणं असली तरी तुमचा आहार जर व्यवस्थित असला, विशेषत: तुमच्या आहारातून जर तुम्हाला पुरेसे ओमेगा थ्री अँसिड मिळत असेल तर भविष्यातील अल्झायमरचा धोका निश्चित टळू शकतो हे आता शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.
कशातून मिळतं ओमेगा थ्री अँसिड?
अक्रोड, मासे, अंबाडीच्या बिया, सायाबिन, पालक यासारख्या अन्नघटकांमध्ये ओमेगा थ्री अँसिडचं प्रमाण चांगलं असतं. हे अन्नघटक जर पुरेशा प्रमाणात खाल्ले गेले तर अल्झायमरच्या आजारातून वाचता येईल असं हे नवं संशोधन सांगतं.
अल्झायमरमुळे तुमच्या स्मृतीचा तर नाश होतोच, पण मेंदुची अनेक कार्यंदेखील त्यामुळे विस्कळीत होतात. शास्त्रज्ञांना ओमेगा थ्री अँसिड आणि अल्झायमर यांच्यात खूप जवळचा संबंध दिसून आला.
अनेक लोकांवर त्यांनी प्रयोगही केले. ज्यांच्या शरीरात ओमेगा थ्री अँसिडचं प्रमाण कमी आहे, त्यांना अल्झायमरचा धोका वाढतो हे या संशोधनात दिसून आलं.
ओमेगा थ्री अँसिडचं महत्त्वाचं कार्य म्हणजे मेंदूतील स्मृती आणि शिक्षणाच्या संदर्भातील जी केंद्रे आहेत, तेथील रक्तपुरवठा वाढवणं. त्यामुळे साहजिकच ही केंद्रे कार्यक्षम राहतात आणि अल्झायमरसारखे विकार डोकं वर काढत नाहीत.
अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनात ओमेगा थ्री अँसिड आणि तुमच्या भावभावना यांचाही जवळचा संबंध आहे असं आढळून आलं.
त्यामुळे कुठल्याही आजारापासून तुम्हाला वाचायचं असेल तर आधी आहारासंदर्भातील आपली लाइफस्टाइल बदला आणि भविष्यातही आपला मेंदू कार्यरत ठेवायचा असेल तर फक्त आपल्याखाण्यापिण्याकडे थोडंसं लक्ष द्या.
बस्स. एवढंच.