तुमच्याकडे १०, २० किंवा ४० मिनिटे आहेत? मग यमराजाला असं ठेवा लांब! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 08:18 AM2022-11-11T08:18:18+5:302022-11-11T08:18:55+5:30

आज आपलं सगळ्यांचंच आयुष्य अतिशय वेगवान झालेलं आहे. कोणत्याच गोष्टीसाठी आपल्याला वेळ नाही.

Do you have 10 20 or 40 minutes Then keep do exercise for better health | तुमच्याकडे १०, २० किंवा ४० मिनिटे आहेत? मग यमराजाला असं ठेवा लांब! 

तुमच्याकडे १०, २० किंवा ४० मिनिटे आहेत? मग यमराजाला असं ठेवा लांब! 

Next

आज आपलं सगळ्यांचंच आयुष्य अतिशय वेगवान झालेलं आहे. कोणत्याच गोष्टीसाठी आपल्याला वेळ नाही. जे काही पाहिजे, ते आत्ता, लगेच, ताबडतोब. समजा थोडं थांबलो, तरी लगेच आपण जगाच्या पिछाडीला जाऊ आणि हा गेलेला वेळ पुन्हा कधीच भरून येणार नाही, अशी भीती आपल्याला वाटत असते. आता आपलं आयुष्यच इतकं धावपळीचं असताना, त्यात पुन्हा व्यायाम, खेळ वगैरे गोष्टींसाठी वेळ कसा काढणार? त्यामुळे अनेकजण त्या नादाला लागतच नाहीत. 

रोज अर्धा-एक-दीड तास व्यायामात घालवण्यापेक्षा त्यावेळेत काही तरी शिकता येईल, पैसा मिळविण्याच्या काही युक्त्या शोधता येईल, आणखी पैसा कमावता येईल, असं अनेक जणांना वाटत असतं. शिवाय आपलं आयुष्य एकदम तंदुरुस्त असावं, आपल्या आयुष्याची दोरी खूप बळकट असावी आणि निरोगी, दीर्घायुष्य आपल्याला लाभावं अशी तर प्रत्येकाचीच इच्छा असते. भरपूर पैसा मिळवला की, या साऱ्या गोष्टी आपल्याला ‘विकत’ घेता येतील, त्या आपोआपच येतील, असंही काहींना वाटतं, पण घोडं पेंड खातं ते नेमकं तिथेच! 

जगभरातले संशोधक, आरोग्यतज्ज्ञ यांचं म्हणणं आहे, तुम्हाला दीर्घ आणि सुदृढ आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला घाम गाळावाच लागेल. खेळ खेळावा लागेल, व्यायाम करावा लागेल! आता आली का पंचाईत? घाम गाळायचा म्हणजे किती गाळायचा? किती वेळ व्यायाम करायचा? कोणता करायचा? कसा करायचा? - असे अनंत प्रश्न...

पण आपले हे प्रश्नही संशोधकांनी एकदम सोपे करून टाकले आहेत. मुख्य म्हणजे तुम्हाला किती काळ जगायचं आणि किती निरोगी जगायचं हा प्रश्न आणि त्याचं उत्तरही आपल्याकडेच असल्याचं त्यांनी आकडेवारीसह सांगून टाकलंय. 

खेळ आणि फिटनेसची उपकरणं बनविणारी ‘स्वेटबॅण्ड’ ही अमेरिकन कंपनी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आदी अनेक संस्थांच्या संशोधकांनी वेगवेगळी आणि एकमेकांना पूरक अशी संशोधनं करून त्याचं सार लोकांपुढे ठेवलं आहे. 

त्यांचं म्हणणं आहे, तुमच्याकडे फार वेळ नाही ना, तुमचं शेड्यूल फारच बिझी आहे ना,  पण रोज किमान दहा मिनिटं तुम्ही काढू शकाल? तेवढा वेळ जरी तुम्ही स्वत:साठी काढला तरी तुमच्या आयुष्याची दोरी जवळपास दोन वर्षांनी वाढेल आणि त्या दोरीचा पीळही मजबूत होईल. 

रोज दहा मिनिटं, खरंतर आठवड्याला साधारण ७० ते ७५ मिनिटं व्यायाम तुम्ही केला, तोही असा विभागून, तरीही त्याचे सगळे फायदे तुम्हाला मिळतील. तुम्हाला जर आयुष्य थोडं आणखी जगायचं असेल, तर त्यासाठी आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम करावा लागेल. म्हणजे दररोज २० मिनिटे. त्यामुळे तुमचं आयुष्य तब्बल साडेतीन वर्षांनी वाढेल. साडेतीन वर्षांनी काय होतंय, आणखी थोडं आयुष्य पाहिजे? - मग व्यायाम आणखी थोडासा वाढवा. दर आठवड्याला ३०० मिनिटे, म्हणजे रोज साधारण ४० मिनिटे व्यायाम तुम्ही केला तर तुमचं आयुष्य जवळपास साडेचार वर्षांनी वाढेल! - थांबा, व्यायाम पहिल्यापेक्षा दुप्पट केला, म्हणजे आपलं आयुष्यही दुप्पट होत जाईल, असा ठोकताळा तुम्ही मांडत असाल, तर तसं नाही. कोणतीही गोष्ट ‘अति’ केली तर त्याचं काय होतं, ते तुम्हालाही चांगलंच माहीत आहे. 

आपल्याला व्यायामासाठी किती वेळ काढता येईल आणि त्याचा काय फायदा होईल, त्यामुळे आपलं आयुष्य किती वाढेल, हे तर आता तुम्हाला कळलंय. मग करा सुरूवात. कधी करताय सुरूवात? हो, पण हा व्यायाम कसा कराल, हे तर आपण समजून घेतलंच नाही! संशोधकांनी सांगितलंय, समजा तुम्ही दहा मिनिटे व्यायाम करताय, पण तो अंळमटळम करत करू नका. म्हणजे हा व्यायाम जरा फुर्तिला असला पाहिजे. थोडा घाम आला पाहिजे. दम लागला पाहिजे. एखादं वाक्य बोलल्यानंतर दुसरं बोलण्यासाठी श्वास घ्यायला थांबावं लागलं पाहिजे. रनिंग, स्वीमिंग, चढावर सायकलिंग, जिने चढणं-उतरणं वगैरे... जे चाळीशीत किंवा त्यापुढे आहेत, त्यांना तर याचा जास्त फायदा आहे!

यमराजाला ठेवा लांब! 
हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं म्हणणं आहे, ४० वर्षे वयावरील लोकांनी रोज वीस मिनिटांपेक्षा कमी व्यायाम केला, तरीही त्यांचा मृत्यूचा धोका वीस टक्क्यांनी कमी होईल. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या मते जे काहीच व्यायाम करत नाहीत, त्यांच्यात पुढील पाच वर्षांत मृत्यूचा धोका साधारण चार टक्के असतो. तुम्ही रोज दहा मिनिटे व्यायाम केला, तर तो दोन टक्क्यांवर येईल आणि तासभर व्यायाम केलात, तर तो एक टक्क्याच्याही खाली येईल!

Web Title: Do you have 10 20 or 40 minutes Then keep do exercise for better health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.