जमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:51 PM2018-08-18T15:51:06+5:302018-08-18T15:51:54+5:30
भारतीय संस्कृतीमध्ये जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत आहे. अजूनही उभं राहून न जेवता जमिनीवर बसून जेवण्याचा सल्ला देण्यात येतो. जमिनीवर बसून जेवण्याचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत.
(Image Creadit : Indiatimes.com)
भारतीय संस्कृतीमध्ये जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत आहे. अजूनही उभं राहून न जेवता जमिनीवर बसून जेवण्याचा सल्ला देण्यात येतो. जमिनीवर बसून जेवण्याचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. जमिनीवर मांडी घालून बसणं हा एक पद्मासनाचाच प्रकार असून या आसनाचे आपल्या शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. जाणून घेऊयात जमिनीवर बसून जेवण्याचे आरोग्यदायी फायदे...
- जमिनीवर बसून जेवल्याने पचन क्रिया नीट होते. जेवताना जेव्हा आपण घास खाण्यासाठी खाली वाकतो त्यावेळी पोटातील मांसपेशींची हालचाल होते आणि त्या सक्रिय होतात. त्यामुळे अन्न पचवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अॅसिडचे प्रमाण वाढते आणि अन्न पचवण्यासाठी मदत होते.
- जमिनीवर बसून जेवल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवताना जेव्हा आपण मांडी घालून खाली बसतो. त्यावेळी आपला मेंदू शांत होतो. त्यामुळे जेवणावर लक्ष केंद्रित होणं सोपं जातं. बसून जेवल्यामुळे पोटाला आणि मेंदूला पोट भरल्यानंतर समजणं शक्य होतं. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाण्यापासून वाचणं शक्य होतं.
- जेव्हा मांडी घालून जमिनीवर बसतो. त्यावेळी पाठीचा मणका आणि पोटाच्या आजूबाजूचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
- जमिनीवर बसून जेवल्याने तुमचं ध्यान जेवणावर राहतं. त्यामुळे मन शांत राहतं आणि शरीराला योग्य पोषक तत्व स्विकारण्यास मदत मिळते.
- जमिनीवर बसून जेवल्याने तारूण्य टिकून राहण्यास मदत होते. कारण मांडी घालून जेवल्यावने पाठीचा मणका आणि पाठी इतर समस्या होत नाहीत.