जेवण केल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ शकता का? जाणून घ्या फायदे आणि आयुर्वेदिक महत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 11:10 AM2024-01-05T11:10:43+5:302024-01-05T11:11:16+5:30
धातू शरिरासाठी कसे फायदेशीर हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यात तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध मानलं जातं. आयुर्वेदातही याला फार महत्व देण्यात आलंय.
कोरोना महामारीपासून लोक आरोग्याची काळजी घेण्याबाबत फारच जागरूक झालेले दिसतात. जास्तीत जास्त लोक आहाराबाबत, फिटनेसबाबत काळजी घेताना दिसतात. पाणी पिण्यापासून ते झोपण्या-उठण्याच्या सवयीही लोक बदलत आहेत. यातील एक चांगली सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं.
धातू शरिरासाठी कसे फायदेशीर हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यात तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध मानलं जातं. आयुर्वेदातही याला फार महत्व देण्यात आलंय. यातील पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. केवळ आयुर्वेदातच नाही तर याला सायन्सनेही फायद्याचं मानलं आहे. चला जाणून घेऊया तांब्याच्या भांड्याचे फायदे…..
बॅक्टेरियांपासून बचाव
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. याने शरीरातील तांब्याची कमतरता पूर्ण होते. याने रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित राहतं.
अनेक आजारांचा धोका टाळतो
तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी अधिक शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट करतं.
वेदना, वात, सूज कमी होते
तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.
कॅन्सरपासूनही बचाव होऊ शकतो
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात.
पोटदुखी, गॅस दूर होतो
पोटाच्या वेगवेगळे आजार पळवून लावण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे केल्यास तुमचा डॉक्टरकडे होणारा खर्च नक्कीच कमी होऊ शकतो. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.
त्वचेसंबंधी समस्या होतात दूर
तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे पिंपल्स तसेच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि अधिक चमकदार होते.
बॉडी डिटॉक्स
शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.
किती ठेवावं पाणी आणि कधी प्यावं?
तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. जेवण केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने नुकसान होऊ शकतं. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनासंबंधी फायदा होतो. जर जेवण करून हे पाणी प्याल तर पचनाला समस्या होऊ शकते.
हे पाणी पिऊन फायदे मिळवायचे असतील तर पाणी तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवावं. 48 तास तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवू शकता. जास्त वेळ भांड्यात पाणी ठेवूनही ते शुद्धच राहतं.