तुम्हाला झोपल्यावर घाम येतो का? मग या कारणांचा विचार करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:43 PM2018-10-10T12:43:44+5:302018-10-10T12:44:21+5:30
रात्री भरपूर घाम येत असेल तर डॉक्टरांना भेटून तपासणी केली पाहिजे तसेच त्यामागचे नक्की कारण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.
मुंबई- सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला भरपूर घाम आल्याचं लक्षात येतं का? असं असेल तर रात्री घाम घेणारे तुम्ही फक्त एकटेच आहात असे नाही. झोपल्यावर घाम येण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये तुम्ही घेत असलेल्या जाडजूड पांघरुणांपासून मसालेदार खाण्यापर्यंत आणि इतर अनेक लहानमोठ्या कारणांचा त्यामध्ये समावेश होतो.
अमेरिकन बोर्ड आॅफ फॅमिली मेडिसिन या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये यातील काही कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. पॅनिक अटॅक्स, निद्राविषयक तक्रारी, ताप, हात आणि पायांना येणारे बधिरपण, चिंता, ताण आणि श्वास घेण्यासाठी होणारा त्रास अशी कारणं त्यांनी नमूद केली आहेत. नैराश्य आणि मधुमेहावरती दिल्या जाणाऱ्या काही औषधांमुळेही असा त्रास होऊ शकतो असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. काहीवेळेस कर्करोग, पक्षाघात, थॉयरॉइड संबंधी आजार यामुळेही घाम येऊ शकतो असे मत मेयो क्लिनिकतर्फे मांडण्यात आले आहे.
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची पातळी कमी झाल्यामुळे रात्री घाम येण्याची शक्यता वाढते. रात्री अशाप्रकारे भरपूर घाम येत असेल तर डॉक्टरांना भेटून तपासणी केली पाहिजे तसेच त्यामागचे नक्की कारण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.