तुम्हाला वाटतं, आपल्याला दात नीट घासता येतात?

By Admin | Published: May 31, 2017 04:27 PM2017-05-31T16:27:03+5:302017-05-31T16:27:34+5:30

आपण दात रोज घासत असलो तरी दात कसे घासायचे हे अनेकांना माहितीच नसतं!

Do you think you can brush your teeth? | तुम्हाला वाटतं, आपल्याला दात नीट घासता येतात?

तुम्हाला वाटतं, आपल्याला दात नीट घासता येतात?

googlenewsNext

- नितांत महाजन

स्वच्छ पांढरे दात, त्यासाठीच्या किती जाहिराती आपण रोज टीव्हीवर बघतो. रोज नियमित दात घासतो. खरंतर रात्री झोपताना रोज दात घासायला पाहिजे पण काहीजण एकदाच दात कसेबसे घासतात आणि लागतात कामाला दातांच्या आरोग्याविषयीच नाही तर एकुणच मौखिक आरोग्याविषयी आपल्याकडे घोर अज्ञान आहे.त्यात दंतउपचार महाग, त्यामुळे दात किडला, दुखला तरी अनेकजण अगदी असह्य होईपर्यंत दाताच्या डॉक्टरकडे जातच नाहीत. आणि बहुसंख्य माणसं तर भल्यासकाळी इतके भरर्कन दात घासतात की शून्य मिनिटात त्यांचे दात घासून होतात. त्यातून दातांना कीड, सुजलेल्या हिरड्या, मुख दुर्गंधी अशा कटकटी सर्रास मागे लागतात. मात्र त्याहीकडे कुणी लक्ष देत नाही. गोष्ट अगदी साधी वाटत असली आणि अत्यंत सामान्य भासत असली तरी ती अत्यावश्यक आहे. आणि सत्य तर हेच आहेत की, दात कसे घासायचे हे अत्यंत महत्वाचे कौशल्य आपल्याकडे कुणी शिकवतही नाहीत. त्याउलट लाइफ स्किल्स शिकवणाऱ्या जपानी शाळांमध्ये तर दात घासणं शिकवण्याचा एक खास समारंभच असतो. त्याला हामागाकी म्हणतात. मुलांना दात उत्तम घासता येणं, ते त्यांना आवडणं ही शालेय शिक्षणातील महत्वाची गोष्ट ठरते. आपल्याकडे रट्टामारु शिक्षणपद्धतीत हे होत नसलं तरी जब जागे तब सबेरा या न्यायाप्रमाणे दात घासण्याच्या उत्तम रीती शिकून घेतलेल्या बऱ्या!
त्याआधी आपण दात घासताना काय चूका करतो हेदेखील माहिती करुन घ्यायला हवं.



घाई घाई उरकून टाकताय?
आपण दात घासायला किती वेळ देतो? मिनिटभरापेक्षा जास्त वेळ देत नाही. कसेबसे खसखसा दात घासतो. अनेकांना वाटतं जितकी जास्त ताकद लावू तेवढे दात स्वच्छ होतात. पण तसं नाही. सावकाश, हलक्या हातानं, मायेनं आणि मसाज करतो तसे हळूवार दात घासायला हवेत. त्यानं दातांना, हिरड्यांना इजा होत नाही.

ब्रश कसा निवडता?
आपण विचारच करत नाही. दुकानदार जो देतो तो ब्रश आपण आणतो. पण हार्ड ब्रिसल्स, सॉफ्ट ब्रिसल्स आपल्या दाताला नक्की कसा ब्रश हवा हे आपण ना दातांना विचारतो, ना दातांच्या डॉक्टरला. पण चुकीचा ब्रश वापरला तर दातांना आणि हिरड्यांना लागून असलेलं इनामेल फाटतं, त्याला इजा होते. हिरड्यांतून रक्त येतं, पू येतो. तसं न करता उत्तम आणि योग्य ब्रश निवडायला हवा.

गुळण्या करताय?
खरंतर लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं, गुळण्या करा, चूळ भरा पण मोठं होताहोता आपण ते विसरतो. दिवसातून एका जेवणानंतर तरी शक्यतो झोपताना तरी कोमट पाण्यानं गुळण्या करायला हव्यात.

पाणी कमी पिताय?
आता याचा दाताच्या आरोग्याशी काय संबंध? पाणी कमी राहिलं, तोंड आतून कोरडं झालं तरी तिथं बॅक्टेरियांची वाढ जोरात होते.त्यानं तोंडाला दुर्गंधी येते, दाताला कीड लागू शकते. त्यामुळे पाणी भरपूर प्या.

दाताच्या डॉक्टरकडे जाताय?
हे काम महागडं असतं हे मान्य. पण दात किडल्यावर आपण पैसे खर्च करतोच. त्यापेक्षा दर सहा महिन्यांनी डॉक्टरकडे जावून दात क्लिन करुन घेणं उत्तम.

Web Title: Do you think you can brush your teeth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.