Doctors Day: कोरोनाग्रस्तांसाठी डॉक्टर्स बनले देवदूत; २४ तास रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 12:41 AM2020-07-01T00:41:15+5:302020-07-01T06:43:41+5:30
देशभर १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण रुग्णसेवेचा वसा डॉक्टरांनी या अवघड काळात कसोशीने जपला आहे.
नामदेव मोेरे
नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी गेले ११० दिवस येथील डॉक्टर्स अविरतरपणे काम करत आहेत. मनपा व खासगी रुग्णालयात अनेक कर्तव्यदक्ष डॉक्टर्स सुट्टी न घेता अनेक जण १० ते १५ तास परिश्रम करत आहेत. ते घेत असलेल्या मेहनतीमुळेच आतापर्यंत ३,७५४ जण कोरोनामुक्त झाले आहे.
देशभर १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण रुग्णसेवेचा वसा डॉक्टरांनी या अवघड काळात कसोशीने जपला आहे. नवी मुंबईमध्येही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांविषयी आदर वाढू लागला आहे. शहरात १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यावर पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुख्य आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी सर्व आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी साप्ताहिक सुट्टी वगळता सलग ११० दिवस सुट्टी न घेता अथकपणे डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांना त्यांच्या घरात, इमारतीमध्ये व परिचितांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. एवढेच काय तर,रू ग्णांना त्यांच्या नातेवाइकांनाही भेटता येत नाही. या काळात हे डॉक्टरच त्यांचा आधारवड झाले. चोवीस तास रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांची धडपड ही कायम लक्षात राहील अशी आहे.
या काळात अनेक गरोदर महिलांची बाळंतपण झाली. त्यातल्या अनेकींना लागण झाली. त्यांची प्रसूती उत्तम करण्यासाठी डॉक्टरांनी श्रम घेतले. घणसोलीमधील महिलेला कोरोनाची लागण झाली होती तेव्हा, नवी मुंबई पालिकेतील डॉक्टर्सच्या टीमने हे आव्हान स्वीकारून तिची मनपा रुग्णालयात प्रसूती करून दोघांचेही जीव वाचविले होते. मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये फ्लू क्लिनिक सुरू झाल्यानंतर तर, ताप, सर्दी, खोकला झालेल्यांना कोरोना होत नाही, हे डॉक्टरांनी कृतीतून दाखवून दिले. यामुळे खासगी क्लिनिक सुरू होण्यास मदत झाली आहे. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांनीही चांगली सेवा दिली.
तुर्भे पॅटर्न राबविण्यात मोलाची भर
नवी मुंबर्ईची धारावी अशी ओळख असलेल्या तुर्भे स्टोअर परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला होता. नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये एकाच दिवशी २९ रुग्णही सापडले होते, परंतु डॉ. कैलास गायकवाड व इतर सर्व डॉक्टर्स, कर्मचारी यांनी आव्हान स्वीकारून, येथील रुग्णवाढ रोखण्यात यश मिळवून तुर्भे पॅटर्न तयार केला. आज या तुर्भे पॅटर्नकडे आदराने पाहिले जाते.