Doctor's Day Special 2017 : डॉक्टर आणि रुग्णांचे संबंध असावेत निकोप !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 12:19 PM2017-06-29T12:19:50+5:302017-06-29T17:49:50+5:30

डॉक्टर आणि रुग्णांचे परस्पर संबंध अधिकाधिक निकोप होऊन घट्ट व्हावेत आणि हे आमचे डॉक्टर व हा माझा रुग्ण ही सुहृद्य भावना अधिक रुजावी-फुलावी यासाठी डॉक्टर, रुग्ण, नातेवाईकांनी प्रयत्न करायला हवेत, हे आजच्या ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने सांगावेसे वाटते.

Doctor's Day Special 2017: Doctors and Patients Have Niche! | Doctor's Day Special 2017 : डॉक्टर आणि रुग्णांचे संबंध असावेत निकोप !

Doctor's Day Special 2017 : डॉक्टर आणि रुग्णांचे संबंध असावेत निकोप !

googlenewsNext
ong>-Ravindra More
‘डॉक्टर्स डे’ १ जुलै रोजी साजरा व्हावा यासाठी १९९१ मध्ये भारत सरकारतर्फे डॉक्टर दिवसाची स्थापना झाली. भारताचे सुप्रसिद्ध चिकित्सक डॉ. बिधान चंद्र रॉय (डॉ.बी.सी.रॉय) यांना श्रद्धांजली आणि सन्मान देण्यासाठी १ जुलै रोजी त्यांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. ४ फेबु्रवारी १९६१ रोजी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात आले. त्यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी बिहारच्या पटना येथे झाला होता. डॉ. रॉय यांनी आपली डॉक्टरची डिग्री कलकत्त्यात पुर्ण केली आणि १९११ मध्ये भारतात वापस आल्यानंतर एमआरसीपी आणि एफआरसीएसची डिग्री लंडनमध्ये पुर्ण केली आणि त्याच वर्षी भारतात एक चिकित्सक म्हणून आपल्या आयुष्याची सुरुवात केली. या जगात डॉ. रॉय यांनी श्रेष्ठ सेवा दिल्यानंतर वयाच्या ८० व्या वर्षी १९६२ मध्ये आपल्या जन्म दिवसाच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सन्मानार्थ आणि श्रद्धांजली म्हणून १९७६ मध्ये त्यांच्या नावाने डॉ. बी.सी.रॉय राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात झाली.   

डॉक्टर आणि रुग्णांचे परस्पर संबंध अधिकाधिक निकोप होऊन घट्ट व्हावेत आणि हे आमचे डॉक्टर व हा माझा रुग्ण ही सुहृद्य भावना अधिक रुजावी-फुलावी यासाठी डॉक्टर, रुग्ण, नातेवाईकांनी प्रयत्न करायला हवेत, हे आजच्या ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने सांगावेसे वाटते.      
मात्र सद्याची परिस्थिती पाहता ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना हळुहळु संपुष्टात येऊ लागली आहे. यात समाजव्यवस्थाच दोषी दिसत आहे. वैद्यकीय व्यवसाय केवळ डॉक्टरांच्या हातात न राहता औषध उत्पादक कंपन्या, विविध तपासण्या करणाऱ्या लॅब आणि विमा कंपन्यांच्या हातात गेल्याचेही चित्र दिसत आहे. 
एका बाजूला ग्राहक संरक्षण कायदा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णहित. या संवेदनशील कात्रीत डॉक्टर अडकलेले दिसत आहेत आणि याचा गांभिर्याने विचारही होत नाही. रुग्णांना कमीत कमी आर्थिक मोबदल्यात उत्तम सुविधा पुरविण्याच्या धावपळीत डॉक्टरांची दमछाक होते आणि त्यांचा ताणही वाढतो. ही बाबही ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने लक्षात घ्यायला हवी.  

विशेष म्हणजे १९९५ पासून डॉक्टर व रुग्ण यांच्या नात्यात ग्राहक संरक्षण कायद्याने रितसर प्रवेश केला. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवादच हरवला आहे. सुपर स्पेशलायझेशन, कट प्रॅक्टिस यासारख्या गोष्टींमुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यात दुरावा वाढत चालत आहे. अशाही परिस्थितीत आपल्या सहृदयतेने रुग्णांना आपलेसे करणारे डॉक्टर आपल्या आसपास आहेत हे विसरता कामा नये. 

मात्र दुसरीकडे मोठमोठी हॉस्पिटल, अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि परदेशी औषधे यामुळे वैद्यकीय उपचार खूपच महागडे झाले आहेत अशी ओरड ऐकावयास येते. या महागड्या वैद्यकीय सेवेमुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. गरिबांचा विचार केला तर त्यांनी आजारी पडूच नसे असे वाटते. त्यामुळे समाज उद्विग्न झाला आहे आणि लोकांचा वैद्यकीय सेवेवरील विश्वास उडत डॉक्टर व रुग्ण यातील दरी वाढत चालली आहे. मात्र, या व्यवस्थेतील दोषांवर मात करणे शक्य आहे आणि रुग्ण हा केंद्रस्थानी मानून वैद्यकीय निती व शिष्टाचार, आचारसंहितांचे पालन करून डॉक्टरने स्वत:तील सर्व कौशल्य पणाला लावले तर स्वस्त व यशस्वी रूग्णसेवा देता येऊ शकते.   

भारतीय वैद्यक परिषद म्हणजेच मेडिकल कॉन्सिल आॅफ इंडियातर्फे याबाबतचे काही नियमही ठरविण्यात आले आहेत. त्यात वैद्यकीय व्यवसाय हा केवळ आर्थिक लाभासाठीचा व्यवसाय नसून  तो रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी जीव तोडून करावयाची एक सेवा आहे. व्यवसाय आणि सेवा यात डॉक्टर सेवेच्या बाजूला थोडा जास्त झुकला पाहिजे. रुग्णाविषयी डॉक्टरला वाटणारी आस्था पाहूनच रुग्ण काही प्रमाणात बरा झाला पाहिजे. विशेषत: हे करीत असताना डॉक्टरांनी रुग्णाबाबत कुठलाही भेदभाव करु नये. मात्र या नियमांचे किती काटेकोरपणे पालन होते आणि हे तपासण्याची जबाबदारी कुणाची आहे? हे जाणून घेणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.   

शेवटी एकच सांगावेसे वाटते की, डॉक्टर व पेशंट दोघांनीही एकमेकांची प्रतिष्ठा, आदर सांभाळण्याची आवश्यकता असते. कुठलाही पेशंट पूर्ण बरा झाला नाही किंवा दगावला असता, रुग्णांच्या नातेवाईकांनीही संयम बाळगायला हवा.  

Web Title: Doctor's Day Special 2017: Doctors and Patients Have Niche!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.