समज... गैरसमज...!  सकाळी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? बघा, तज्ज्ञ काय सांगताहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 04:54 PM2024-05-31T16:54:23+5:302024-05-31T16:56:49+5:30

गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? हा एक चर्चेचा विषय आहे. तर जाणून घेऊयात यासंदर्भातील फॅक्ट...? काय सांगताहेत आहार तज्ज्ञ...?

Does drinking hot water in the morning really reduce weight? See what the experts say | समज... गैरसमज...!  सकाळी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? बघा, तज्ज्ञ काय सांगताहेत

समज... गैरसमज...!  सकाळी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? बघा, तज्ज्ञ काय सांगताहेत

बरेच लोक आपले वजन कमी करण्यासाठी सकाळी झोपेतून उठले की, गरम पाणी घेतात. ते इतरांनाही अशा प्रकारचा सल्ला देत असतात. एवढेच नाही, तर गरम पाणी पिणारे दोन लोक भेटले आणि विषय निघाला की, त्यांच्यात कोण किती पाणी पितं? यावरही चर्चा होताना आपण अनेक वेळा बघतो, ऐकतो. मात्र, गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? हा खरोखरच चर्चेचा विषय आहे. तर जाणून घेऊयात यासंदर्भातील फॅक्ट...? काय सांगताहेत आहार तज्ज्ञ...?

यासंदर्भात माहिती देताना द माइंडफूल डायटच्या (The Mindful Diet) आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी सांगतात, "जेव्हा आपण सकाळी गरम पाणी घेतो, तेव्हा आपला मेटॅबॉलिक रेट वाढायला सुरुवात होते. मेटॅबॉलिक रेट वाढल्याने आपण जे काही अन्नपदार्थ पाण्यासोबत घेतो, ते चांगल्या पद्धतीने पचायला सुरुवात होते. साधारणपणे असे म्हटले जाते की, आपण गरम पाण्यासोबत काही मेडिसीन घेत असू, तर त्या मेडिसीनचे अॅब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होते. ते वेगाने काम करायला लागतात."

गरम पाण्याचे फायदे -
मंजिरी कुलकर्णी सांगतात, "खरे तर, गरम पाण्याचे निश्चितच भरपूर फायदे आहेत. आपण जेव्हा गरम पाणी प्यायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या शरीरातील सूज वेगाने कमी होते. आता वजन कमी होतं म्हणजे काय? तर, जेव्हा आपली लाईफस्टाइल चांगली नसते किंवा आपल्या खाण्याच्या सवयी हेल्दी नसतात, तेव्हा आपल्या शरिरात एक प्रकारची सूज तयार झालेली असते. साधारणपणे ओबेसिटीमध्ये अथवा ओबेसिटी रिलेटेड डिसॉर्डरमध्ये ही सूज आपल्याला दिसून येते. यामुळे, जेव्हा एखादी वजन जास्त असलेली व्यक्ती गरम पाणी प्यायला सुरुवात करते, तेव्हा गरम पाणी प्यायल्याने मेटॅबॉलिक रेट वाढतो आणि यामुळे शरीरातील सूज झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते." 

"ही कमी झालेली सूज आपल्याला वजनाच्या म्हणजेच आकड्यांच्या स्वरुपात दिसते. पण यामुळे, चरबीचे प्रमाण कमी होत नाही. चरबीचे प्रमाण कमी होण्यासाठी आपल्याला डायटरी चेन्जसच आवश्यक आहेत आणि तेच करणे अपेक्षित आहे. म्हणजे आपण काहीही खात आहात आणि गरम पाणी रोज पीत आहात, तर गरम पाणी प्यायल्यानेच तुमची चरबी अथवा वजन कमी होईल असे नाही," असेही मंजिरी कुलकर्णी सांगतात. 

गरम पाणी दिवसभर चहा प्रमाणे घेतले तर...? -
त्या पुढे सांगतात, "गरम पाण्याचा फायदा निश्चितच होतो. आपल्या शरीरावरील सूज कमी होते. डायजेशन व्यवस्थित होते. मात्र, याचा अर्थ असा नाही की, आपण वाटेल ते खाऊ शकता आणि नुसतेच गरम पाणी घेऊन तुमचे वजन कमी होते. तर गरम पाण्याने मेटॅबॉलिक रेट वाढतो, डायजेशन चांगले होते. गरम पाणी केवळ सकाळीच न पिता, आपण दिवसभर चहा प्रमाणे घेत असाल तर त्याचे फायदेही खूप चांगले आहेत." 

गरम पाणी सर्वांना चालते का?
गरम पाणी सर्वांना चालते का? यासंदर्भात बोलताना मंजिरी म्हणतात, "नाही. ज्या लोकांना उष्णतेचे विकार आहेत, ज्यांना पाइल्स सारखी समस्या आहे, अशा लोकांना गरम पाणी चालत नाही. यामुळे, आपण गरम पाणी प्यायला सुरुवात करायची आहे की नाही, हे आपण आपले शरीर आणि प्रकृती बघून ठरवायला हवे." 

Web Title: Does drinking hot water in the morning really reduce weight? See what the experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.