Booster Dose: बुस्टर डोसची गरज निरोगी मुलांना आहे का? WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी दिली 'ही' प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 04:59 PM2022-01-20T16:59:13+5:302022-01-20T17:02:18+5:30
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनाही बूस्टर डोस दिले जातायत. यानंतर आता निरोगी बालकांनाही बूस्टर डोसची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. या लाटेदरम्यान दररोज २ लाखांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद होतेय. नुकतंच सरकारने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू केलंय. तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनाही बूस्टर डोस दिले जातायत. यानंतर आता निरोगी बालकांनाही बूस्टर डोसची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
निरोगी मुलांना बूस्टर डोस देण्याच्या मुद्द्यावर, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, निरोगी मुलं आणि किशोरवयीन यांना कोरोनाच्या बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचा कोणताही पुरावा अजून मिळालेला नाही.
दरम्यान अमेरिका, जर्मनी आणि इस्रायलसह इतर देशांनी मुलांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात केलीये. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं की, ओमायक्रॉन व्हेरिएंटविरूद्ध लसीची प्रतिकारशक्ती कमी झाल्याची चर्चा आहे. परंतु यावर अधिक संशोधन आवश्यक आहे.
स्वामीनाथन म्हणाल्या, डब्ल्यूएचओने वृद्ध आणि आजारी लोकांना बूस्टर शॉट्स देण्याची आवश्यकता असल्याचं पूर्णपणे नाकारली नाही. बूस्टर डोसवर निर्णय कसा घ्यायचा यावर चर्चा करण्यासाठी प्रमुख तज्ज्ञांचा गट या आठवड्याच्या शेवटी बैठक घेणार आहे. सौम्या स्वामीनाथन यांच्या मते, बूस्टर डोसचा उद्देश गंभीर आजार असलेल्यांचं संरक्षण करणं असा आहे. आरोग्य कर्मचार्यांनाही याची गरज आहे, त्यामुळे त्यांनाही बूस्टर डोस दिले जातायत. मात्र अजूनही बूस्टर डोसवर अजून खूप अभ्यासाची गरज आहे.