स्वप्नांच्या रहस्याचा उलगडा होतो का? मानसशास्त्रज्ञांनी केलेला परामर्श वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 08:26 AM2021-10-08T08:26:06+5:302021-10-08T08:26:19+5:30
या अर्थ लावण्याचा उपयोग प्रत्यक्ष आयुष्यात कसा करता येईल याबद्दल विवेचन असेल आणि शेवटच्या लेखात स्वप्नांचा मेंदूच्या कार्यरचनेशी संबंध आणि स्वप्नांचे विकार यासंबंधात चर्चा असेल.
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा !
स्वप्नांतील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?
- सुप्रसिद्ध गीतकार सुधीर मोघे यांच्या या काव्यपंक्ती आपल्या सगळ्यांच्या मनातील स्वप्नांबद्दलचे कुतूहल यथार्थपणे वर्णन करतात. निद्रेसंदर्भातील प्रत्येक व्याख्यानानंतर, मग ते डॉक्टरांकरिता असो अथवा सर्वसामान्यांकरिता असो, अमेरिकन किंवा भारतीय श्रोत्यांकडून स्वप्नांसंबंधी प्रश्न हमखास विचारला जातो.
स्वप्नांबद्दलचे हे कुतूहल साहजिक आहे. अगदी पुरातन काळामध्ये बुधकौशिक ऋषीला पडलेले स्वप्न ‘रामरक्षास्तोत्र’ या नावाने प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक काळात, शिवाजीराजांना १६ व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पडले. या स्वप्नाच्या पूर्तीकरता सैन्याची, पर्यायाने शस्त्रनिर्मितीची नितांत गरज होती. ही गरज पैशाच्या अभावी पुरी झाली नसती. स्वराज्याची निर्मिती कठीण झाली असती. अशा अवघड वेळेला तोरण्याच्या पायथ्यापाशी असलेल्या गुप्तधनाचे स्वप्न शिवरायांना पडले आणि नेमके त्याच जागी मोहरांनी भरलेले घडे सापडले, अशी स्वप्नांची ऐतिहासिक महतीही आहे.
पुढील लेखांमध्ये आपण स्वप्नांसंदर्भातले अनेक प्रश्न अभ्यासणार आहोत. ह्या पहिल्या लेखामध्ये जनसामान्यांमध्ये कुठली स्वप्ने पडतात? प्राण्यांना स्वप्ने पडतात का? याचा परामर्श घेऊ या. पुढच्या लेखात स्वप्नांचा अर्थ वेदकाळापासून ते आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी लावायचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल माहिती असेल. या अर्थ लावण्याचा उपयोग प्रत्यक्ष आयुष्यात कसा करता येईल याबद्दल विवेचन असेल आणि शेवटच्या लेखात स्वप्नांचा मेंदूच्या कार्यरचनेशी संबंध आणि स्वप्नांचे विकार यासंबंधात चर्चा असेल. स्वप्न म्हणजे नक्की काय? याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद असला तरी या लेखापुरते स्वप्न, दिवास्वप्न आणि झोपेत चालणारे फुटकळ विचार यात फरक केला आहे.
स्वप्न पाहणे म्हणजे झोपेमध्ये अनुभूती / विचार अथवा भावना या प्रत्यक्षात घडत असल्याचा भास होणे. बहुतांश स्वप्नांमध्ये स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तींची भूमिका ही त्यात भाग तरी घेणारी असते अथवा एक प्रेक्षक म्हणून असतेच. तसेच कुठली तरी कृती चालू असते. मग ती बघणे असेल अथवा पळणे / चालणे असेल, आणि इतर व्यक्तींबरोबर संवाद असेल!! बहुतांश स्वप्नांमध्ये स्वत:खेरीज एक तरी व्यक्ती किंवा प्राणी असतातच.
- डॉ. अभिजित देशपांडे
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस
iissreports@gmail.com