दान - पैशाचे नव्हे, तुमच्या अवयवांचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 05:26 AM2021-08-13T05:26:14+5:302021-08-13T05:26:32+5:30

अवयवदानाचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना नेहमीच एक प्रश्न विचारला जातो- अवयवदान कोण, कधी व कसे करू शकतो? - कोणीही निरोगी व्यक्ती तीन टप्प्यांत अवयवदान करू शकते.  

Donation not of money but of your organs | दान - पैशाचे नव्हे, तुमच्या अवयवांचे!

दान - पैशाचे नव्हे, तुमच्या अवयवांचे!

googlenewsNext

- आशा कुलकर्णी, antidowry498a@gmail.com

असे म्हणतात, मरावे परी कीर्तिरूपे उरावे! - हे फारच थोड्यांना साध्य होते. पण, ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ हे मात्र अति सामान्यांना, गरीब-श्रीमंत सर्वांनाच शक्य होण्यासारखे आहे. अवयवदानाचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना नेहमीच एक प्रश्न विचारला जातो- अवयवदान कोण, कधी व कसे करू शकतो? - कोणीही निरोगी व्यक्ती तीन टप्प्यांत अवयवदान करू शकते.  

(१) जिवंतपणी - बोन मॅरो (सत्त्व चरबी), एक मूत्रपिंड, यकृत - फुप्फुस - स्वादुपिंड या तीन अवयवांचा काही भाग दान करता येतो.  हे फक्त रक्ताच्या व जवळच्या नातेवाइकांमध्येच होऊ शकते. सुदृढ व निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. (२) अपघातात मेंदू मृत घोषित झाल्यास - अशा प्रसंगी हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुप्फुस, स्वादुपिंड, छोटे व मोठे आतडे, स्वरयंत्र, कंठनाळ, गर्भाशय, कानाचा मध्यभाग, त्वचा, हाडे, रक्त धमन्या, रक्त वाहिन्या, मज्जातंतूची शीर, बीजकोष किंवा अंडाशय, हातापायाची बोटे असे अनेक अवयव दान करता येतात. (३) नैसर्गिक मृत्यू आल्यास -  डोळे, त्वचा, हृदयाच्या झडपा, रक्त धमन्या, रक्त वाहिन्या, मृदू अस्थींचे वेस्टन इत्यादी अवयव दान करता येतात. 

नैसर्गिक मृत्यू जर एखाद्या अद्ययावत आधुनिक रुग्णालयात झाला तरच हे अवयव दान शक्य होते. मृत्यू घरीच झाला तर डोळे आणि त्वचा हे दोन अवयव सहजरीत्या दान करता येतात. नेत्रदानाची प्रक्रिया मृत्यूनंतर ३ ते ४ तासांच्या आत करावी लागते. त्वचादानाची प्रक्रिया ८ ते १० तासांच्या आत करावी लागते. यानंतर मृत शरीर विद्रूप होत नाही. तसेच नेत्र व त्वचा दानानंतर देहदानही करता येते. देहदानाचा वैद्यकीय शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी बहुमूल्य उपयोग होतो. अवयवदानातील गैरप्रकार टाळता यावे किंवा मानवी अवयवांचा व्यापार होऊ नये यासाठी १९९४ मध्ये आपल्याकडे ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा’ पारित करण्यात आला. मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाल्याचे निश्चित करून तसे प्रमाणित करणे आणि अशा मेंदूमृत रुग्णाचे कोणते अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत ते ठरवणे, हे या कायद्याचे मुख्य उद्देश.  या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी झोनल ऑर्गन ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरची स्थापना झाली.

या सेंटरच्या  चार जबाबदाऱ्या असतात. (१) अवयवदानाचा प्रचार- प्रसार करणे. (२) अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाची प्रतीक्षा यादी तयार करणे आणि यादीचे संरक्षण करणे. (३) दानात प्राप्त झालेल्या अवयवांचे योग्य प्रकारे वितरण करणे. (४) अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नये याची खबरदारी घेणे.

या सेंटरसाठी अवयवदान समन्वयक  विविध रुग्णालयांत कार्य करतात. एखादा रुग्ण मेंदू मृत घोषित झाल्यास त्या रुग्णाचे अवयव दान करण्यासाठी नातेवाइकांना  प्रवृत्त करण्याचे अत्यंत कठीण काम  समन्वयक पार पाडत असतो तसेच कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी मदत करतो. शरीरातील चेतना व श्वासोच्छ्वास या दोन्हींचे केंद्र मेंदूत ज्या भागात असते त्या भागाला कायमस्वरूपी इजा झाल्यास व्यक्ती ‘ब्रेन डेड’ होते. अशा रुग्णाचे हृदय कृत्रिमरीत्या काही काळ क्रियाशील ठेवता येते. या काळात मेंदू सोडून सर्व अवयव सुरक्षित व कार्यरत असतात; कारण सर्व अवयवांना त्या काळात कृत्रिमरीत्या प्राणवायू पुरवला जातो. 

या काळात अवयव दानाचा निर्णय घेता येतो. मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाल्याचे निदान कायद्यानुसार चार डॉक्टरांची  टीम करते.  न्युरोलॉजिस्ट, फिजिशियन, भूलतज्ज्ञ आणि संबंधित रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर या टीममध्ये असतात. यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्या महाग असल्या तरी अवयव दान करण्यास नातेवाइकांची अनुमती असल्यास त्यात सवलत मिळू शकते.

आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवान स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन हुतात्मा होतात. आज आरोग्य विज्ञानातील संशोधनामुळे एखादा सामान्य नागरिकही जीवनदानासारखे सर्वोच्च दान देऊन मृत्यूनंतरही अवयव रूपात अमर होतो.. ही अवयव दानाची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी कार्यरत सर्व कार्यकर्ते प्रशंसेस पात्र आहेत.

Web Title: Donation not of money but of your organs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.