कोरोनाला घाबरू नका, मात्र काळजी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आरोग्याच्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 10:07 AM2023-12-23T10:07:27+5:302023-12-23T10:07:55+5:30

आरोग्य विभागातील वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Don't be afraid of Corona, but be careful; Health tips given by medical experts | कोरोनाला घाबरू नका, मात्र काळजी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आरोग्याच्या टिप्स

कोरोनाला घाबरू नका, मात्र काळजी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आरोग्याच्या टिप्स

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : देशात आणि राज्यात ‘जेएन-१’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यामुळे कोरोना पसरण्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते या नवीन व्हेरिएंटच्या अनुषंगाने अजिबात घाबरण्याची गरज नाही. संबंधित प्रकारचे रुग्ण आढळत राहतील. ते बरेही होतील. मात्र, नागरिकांनी जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेतली पाहिजे, सतर्क राहिले पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.  

आरोग्य विभागातील वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा अर्थ कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार आहे किंवा लाट येणार आहे, असे नव्हे. आरोग्य यंत्रणा कुठल्याही येणाऱ्या संकटाला सज्ज राहावी म्हणून तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी उगाच भीती बाळगू नये आणि भीती पसरवू नये. जीवनशैली उत्तम ठेवल्यास कोणताही आजार होणार नाही. 

राज्यात १९, तर मुंबईत ८ नवीन रुग्ण 
  राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत.  राज्यात कोविडचे ६८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३४ रुग्ण मुंबई, १४ ठाण्यात, तर रायगडमध्ये ४ रुग्ण उपचार घेत आहेत. 
  शुक्रवारी राज्यात १९ नवीन रुग्ण आढळले आहेत. ४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  मुंबई - ८, ठाणे पालिका क्षेत्र -४, कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्र -१,  रायगड-१, पुणे पालिका क्षेत्र-१, पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्र-२ , सांगली मिरज कुपवाड पालिका क्षेत्र -२, छत्रपती संभाजीनगर - २. 

 सिंधुदुर्गमधील रुग्ण पूर्णपणे बरा  
सिंधुदुर्गात जेएन-१ या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला असून, तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. जेएन-१ हा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा उपप्रकार आहे. यात रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येत आहेत.  मात्र, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे. राज्यात नियमितपणे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेंसिंग) करण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

नववर्षाच्या स्वागतानिमित्त पुढील आठवड्यापासून सर्वत्र गर्दी वाढण्याची चिन्हे असल्याने त्या ठिकाणी जाताना काळजी घ्या. मास्क लावल्यास फायदा होईल. सिंधुदुर्गात जेएन-१ या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला असला तरी या व्हेरिएंटची लक्षणे फारच सौम्य आहेत. त्यामुळे चिंता करायची काही गरज नाही. जास्त विचार करण्यासारखी परिस्थिती नाही.
- डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लीलावती रुग्णालय

सार्स, स्वाइन फ्लू  या आजाराच्या साथी आपल्याकडे मागे येऊन गेल्या आहेत. वर्षभरात या आजाराचे काही रुग्ण आढळतात. त्यामुळे कोरोनाचे काही व्हेरिएंटचे रुग्ण आढळत राहतील. त्यामुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही. आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. आपल्याकडे सर्व गोष्टी पुरेशा प्रमाणात आहेत. आपण आणखी काही सूचना दिल्या आहेत. उगाचच केरळमध्ये काही तरी उपप्रकार आला म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. 
- डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त (आरोग्य)

Web Title: Don't be afraid of Corona, but be careful; Health tips given by medical experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.